

जेजुरी: आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर दौंडजजवळ (ता. पुरंदर) भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालक न थांबता निघून गेला. हा अपघात रविवारी (दि. 23) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला.
अमोल विठ्ठल दगडे (वय 38, रा. सध्या मावडी क.प., ता. पुरंदर. मूळ रा. दौंडज, ता. पुरंदर) व दिग्विजय यशवंत कोलते (वय 34, रा. पिसरवे. ता. पुरंदर) अशी मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.
जेजुरी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, अमोल दगडे व दिग्विजय कोलते हे दोघे दौंडजहून जेजुरीकडे दुचाकीवरून जात होते. त्यांना समोरून येणार्या भरधाव चारचाकी वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथे न थांबता निघून गेला.
गेल्या 2 महिन्यांत 7 ते 8 जणांचा बळी
आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग विकसित होत असताना शिवरी ते निरा मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या गेल्या 2 महिन्यांतील अपघातांत 7 ते 8 जणांचा बळी गेला आहे. या महामार्गावर प्रत्येक गावाच्या चौकाचौकात गतिरोधक, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग पट्टे आदी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.