

पुणे : नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाअंतर्गत कार्यरत ताथवडे (जि. पुणे) येथील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्रावर ईटी-आयव्हीएफ (भ्रूण हस्तांतरण इन विट्रो फर्टिलायझेशन) प्रयोगशाळेत अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा (तीन मादी व एक नर) यशस्वी जन्म झाला आहे. राज्यातील म्हैस संवर्धन व उच्च आनुवंशिक क्षमतेचे पशुधन निर्माण करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.
उच्च आनुवंशिक क्षमतेच्या म्हशींची जलद निर्मिती, उत्कृष्ट दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या पशुधनाचा प्रसार आणि राज्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी ईटी-आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा हा प्रयोग राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमासाठी वाकड (पुणे) येथील स्वप्नील कलाटे यांच्या उच्च दुग्ध उत्पादक मुऱ्हा म्हशीचा डोनर म्हणून वापर करण्यात आला. एका स्त्रीबीज संकलन सत्रात १७ ओसाइट्स (अंडपेशी) संकलित केल्या. त्यापैकी पाच उच्च दर्जाचे भ्रूण विकसित करून ते ताथवडे येथील शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र दाई म्हशींमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले.
यापैकी चार म्हशींमध्ये यशस्वी गर्भधारणा झाली असून, त्यातून तीन मादी व एक नर अशा चार निरोगी मुऱ्हा रेडकांचा जन्म झाला. या संपूर्ण प्रक्रियेत स्त्रीबीज संकलन (ओपीयू) ते भ्रूण प्रत्यारोपणापर्यंतची सर्व तांत्रिक कामे डॉ. विष्णू जवणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. दाई म्हशींची आरोग्य तपासणी व माज नियमनाची जबाबदारी डॉ. रतिकांत नवटके यांनी सांभाळली. या प्रकल्पाची अंमलबजावणी डॉ. उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, जन्मलेल्या रेडकांचे संगोपन व व्यवस्थापन डॉ. उपेंद्र गायकवाड, डॉ. अमोल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
ईटी-आयव्हीएफसारखे आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान भविष्यातील दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे उच्च उत्पादकता, जलद आनुवंशिक सुधारणा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
डॉ. किरण पाटील, पशुसंवर्धन आयुक्त, पुणे