दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना अटक

Four members of a gang of robbers were arrested in preparation for the robbery
Four members of a gang of robbers were arrested in preparation for the robbery
Published on
Updated on

लोणावळा शहर पोलिसांनी केली कारवाई

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळा शहर व परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील हडपसर येथील दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांच्या लोणावळा शहर पोलिसांनी खंडाळ्यात मुसक्या आवळल्या.

तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी दोनजण अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दरोडेखोरांचा दरोडा घालण्याचा प्रयत्न हाणून पडला.

सोहेल जावेद शेख (वय 20), ओमकारसिंग अवतारसिंग जुनी (वय 21, दोघेही रा . वैदुवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास लोणावळा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लतीफ मुजावर, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, सुनील देशमुख, शेखर कुलकर्णी, सतिश कुदळे, शंकर धनगर, मनोज मोरे, पवन कराड, प्रशांत पाटील हे रात्रीची गस्ती घालत होते.

यादरम्यान पोलीस कर्मचारी सतीश कुदळे यांना एका गुप्त बातमीदार मार्फत खंडाळ्यातील टाटा डक्ट लाईन येथील एका पडीक पंप हाऊसमध्ये काही व्यक्ती दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सतीश कुदळे यांनी पोलिस उपनिरीक्षक लतिफ मुजावर यांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील व लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, पोलीस कर्मचारी सुनिल देशमुख , प्रविणकुमार गोसावी, शेखर कुलकर्णी, सतिश कुदळे, पवन कराड, शंकर धनगर, मनोज मोरे, स्वप्नील पाटील, पोलीस मित्र विनोद चव्हाण यांचे पथक संबंधित पंप हाऊस जवळ गेले असता पोलिसांना पाहून दरोडेखोर पळून जाऊ लागले.

तेवढ्यात पोलीस पथकाने चारजणांना मोठ्या शिताफीने जेरबंद करून त्यांच्या मुसक्या आवळल्या तर एकाने अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.

चारजणांपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत. यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक लोंखडी गोलपाईप, तीन छन्नी, एक स्क्रुडायव्हर , दोन मोठे अर्धगोल धारदार विळा, एक वस्तरा, दोन धारधार चाकु, ब्लेडची दोन लहान पाती, एक कात्री, एक विवो कंपनीचा मोबाईल फोन, वायर कटर, कागदात लाल मिरचीची पावडर पुडी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात दरोड्याचे साहित्य आढळून आले असून, पोलिसांनी ते हस्तगत केले.

या संपूर्ण कारवाईमध्ये खंडाळा पोलीस आऊट पोस्ट तसेच लोणावळा गुन्हे अन्वेषण पथकाने मोलाची कामगिरी बजावली. अटक करण्यात आलेल्या सोहेल शेख याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 22 तर ओमकारसिंग जुनी याच्या विरोधात 6 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news