शिवनगर: माळेगाव साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. सत्ताधारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांमध्ये कारखान्याचे वाटोळे केले आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी व्यक्तीकेंद्रित केली आहे.
त्यामुळे सत्ताधारी संचालकांनी केलेल्या चुका पवारांना दिसत नाहीत; मात्र सभासद बंधुनो, माळेगाव कारखान्याची ही निवडणूक सभासदांच्या प्रपंचाची आहे. आपल्या मुलाबाळांच्या भविष्याची आहे, यासाठी मसभासदराजा जागा हो...सहकाराचा धागा होफ असे प्रतिपादन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले. (Latest Pune News)
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने तावरे प्रचार सभेत बोलत होते. सहकारमहर्षी चंद्ररावअण्णा तावरे यांनी माळेगाव कारखान्यासाठी आणि सभासदांच्या भल्यासाठी आपल्या जीवनातील 45 वर्षे खर्च केली आहेत. अण्णांनी वेळोवेळी भविष्याचा वेध घेत सहकारी साखर कारखानदारी अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले.
केंद्र तथा राज्य शासनाच्या बदलत्या धोरणाचा अभ्यास करत वेगवेगळ्या उपपदार्थ निर्मितीसाठी हट्ट धरला; मात्र दरवेळी विरोधकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला. या विरोधाला न जुमानता अण्णांनी डिस्टलरी प्रकल्प उभारला, कारखान्याचे विस्तारीकरण केले, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सभासदांच्या मुलांसह गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षणाची दालने उभी केली.
सभासदांच्या मुला-मुलींचे लग्नसोहळे होण्यासाठी हक्काचे शिवतीर्थ मंगल कार्यालय उभारले. या सर्व गोष्टी करत असताना त्यांनी ऊस दरावर कधीही परिणाम होऊ दिला नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे असे सांगून तावरे यांनी सभासदांचा अण्णांवर पूर्ण विश्वास असल्याचे नमूद केले.
विरोधक सातत्याने खोटी आकडेवारी सांगून सभासदांची दिशाभूल करत आहेत. दुसरीकडे मालतरण कर्ज हमी पूर्ण क्षमतेने वापरल्याने पतसंस्थेच्या ठेवीच्या स्वरूपातील कर्ज काढावे लागले तर कधी नव्हे ते कारखान्याच्या इतिहासात डिस्टलरीवर तीनपट कर्ज घ्यावे लागले. चुकीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळे तसेच नको त्या ठिकाणी गरज नसताना यंत्रसामुग्री वापरात बदल केले, त्यामुळे कारखान्याच्या सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप तावरे यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एवढीच सभासदांची काळजी होती तर त्यांनी मागील पाच वर्षात त्यांच्या संचालकांकडून चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्यावेळी का लक्ष दिले नाही? आता अजित पवार सत्ताधारी संचालक मंडळाच्या चुकांवर पांघरून घालत स्वतः चेअरमन पदाची उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
परंतु माळेगाव कारखान्याचा सभासद सूज्ञ आहे, विरोधकांच्या भूलथापांना सभासदराजा बळी पडणार नाही, अशी खात्री तावरे यांनी दिली. सत्ताधारी संचालक मंडळाने कारखान्यावर कर्जाचा डोंगर केला आहे तर फायनल पेमेंट देण्यासाठी देखील पुन्हा कर्ज काढावे लागेल, अशी अवस्था असल्यामुळे कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत असल्याचा आरोप तावरे यांनी केला.
मागील निवडणुकीत सत्तेचा गैरवापर
कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर केला. अधिकार्यांना हाताशी धरत निकाल बदलले, आमचा एक उमेदवार निवडून आला असताना त्याला पराभूत म्हणून घोषित केले, हे कोणत्या लोकशाहीत बसते? मात्र आता आम्ही तसे होऊ देणार नाही. याबाबत आम्ही वेळोवेळी खबरदारी घेणार आहोत. सभासदांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे आम्ही ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार याची मला खात्री असल्याचे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले.
माझा अपघात झाला होता. मला पाय वळवता येत नसल्याने पायजमा घालता येत नाही. त्यामुळे मला लुंगी वापरावी लागते; मात्र माझ्या लुंगी वापरावर देखील विरोधक टीका करत आहेत.
- चंद्रराव तावरे, माजी अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना