

सासवड: सासवड (ता. पुरंदर) येथे वनरक्षकाला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून, याबाबत सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासवड येथे जेजुरी बीटचे वनरक्षक गोविंद रामेश्वर निर्डे (रा. ओमतारा पश्चिम, जय हिंद हार्डवेअर पाठीमागे, सासवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 4) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली. जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील एका तक्रारदाराने निर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
जवळार्जुन येथे तक्रारदार यांची पाच एकर शेती आहे. शेतीला लागूनच असणार्या वन विभागाच्या जागेत तक्रारदाराकडून (दि. 25) मार्चला थोडा खड़्डा जास्त खोदला गेला. दि. 27 मार्चला जेजुरी बीट वन विभागाचे वनरक्षक गोविंद निर्डे हे कोणीतरी तक्रार केली, असे सांगून मला गुन्हा नोंद करण्याची भीती घालू लागले, असे तक्रारदाराने म्हटले आहे. तक्रारदाराने वन विभागाच्या हद्दीतील खड्डा तत्काळ बुजवला.
त्यानंतरही वनरक्षक गोविंद निर्डे यांनी 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता तक्रारदाराला फोन करून जेजुरी येथील साकुर्डे गावातील रोडवर भेटण्यासाठी बोलावले. जर तुम्हाला गुन्हा नोंद करून घ्यायचा नसेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
तक्रारदाराने वनरक्षक गोविंद निर्डे यांना खूप विनंती केली की, माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मी आपणांस एवढे पैसे देऊ शकत नाही. दि. 3 रोजी तक्रारदाराला पुन्हा वनरक्षक निर्डे यांचा फोन आला व काय केले कामाचे, तुम्ही मला भेटले नाही, असे म्हणाले. वनरक्षक गोविंद निर्डे मागत असलेले पैसे हे लाच असल्याचे माहीत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे वनरक्षक गोविंद निर्डे यांच्याविरुध्द लाचेची तक्रार दिली.
तक्रारदार वनरक्षक गोविंद निर्डे यांची वीर फाटा येथील श्रीनाथ रसवंतिगृह येथे भेट घेण्यासाठी गेले. सापळा पथकाला वनरक्षक गोविंद निर्डे यांनी लाच रक्कम स्वीकारल्याचे दाखवून दिले. त्यानंतर सापळा पथकाने वनरक्षक गोविंद निर्डे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या पँटच्या खिशात असलेली लाचेची रक्कम पंचांसमक्ष हस्तगत केली. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त भारती मोरे, दोन शासकीय पंच, सापळा पथकाने केली.