निर्मितीनंतर पहिल्यांदाच उजनी नीचांकी पातळीत

निर्मितीनंतर पहिल्यांदाच उजनी नीचांकी पातळीत

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर गेल्या 40 ते 45 वर्षांत प्रथमच उजनी (यशवंत सागर जलाशय) धरणाच्या पाण्याने नीचांकी पातळी गाठली आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा वजा 60 टक्के झाला आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात गाळ व वाळू आहे. सध्या पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून, शेतकरी पिके व फळबागा जगविण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये खोलवर चार्‍या खोदून विहिरी तसेच कृषिपंपाजवळ पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई

सध्या जागोजागी उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडेठाक पडले आहे. धरणालगतच्या गावातील शेती तसेच नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस, केळी तसेच अन्य फळबागा पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे पिके व फळबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. काही ठिकाणी असलेल्या अत्यल्प पाण्याच्या स्रोतापासून शेतकर्‍यांनी यापूर्वी खोदलेल्या चार्‍यांतील देखील पाणी संपले आहे. त्यामुळे पुढे पुढे चारी खोदणे किंवा त्या चार्‍यातील गाळ काढण्याची कामे अनेकांनी हाती घेतली आहेत. याशिवाय पावसाळ्याच्या तोंडावर अनेकांनी विहिरीतील गाळ काढणे, विहीर किंवा कूपनलिका खोदाई करणे आदी कामे सुरू केली आहेत. पाण्यासाठी शेतकर्‍यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.

पाण्यासाठी नव्याने चार्‍या खोदण्यास सुरुवात

यापूर्वी 2012 मध्ये देखील धरणाचे पाणी अशाच प्रकारे उन्हाळ्यात कमी झाले होते. त्यावेळी शेतकर्‍यांनी धरणात चार्‍या घेतल्या. त्यानंतर 2028, 2019 मध्ये या चार्‍या लांबविल्या. परंतु, आता 2024 मध्ये मात्र उजनी नीचांकी पातळीवर गेल्याने चारीद्वारे पाणी आणण्याची क्षमता संपली आहे. परिणामी, या चार्‍यांतील गाळ काढून पाणी येण्यास मार्ग करून दिला जात आहे. गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे उजनी धरण पूर्णक्षमतेने भरू शकले नव्हते. धरण केवळ 60 टक्के भरले. मात्र, धरणाच्या पाण्याचा बेसुमार वापर झाला. योग्यप्रकारे नियोजन झाले नसल्याचा आरोप सातत्याने उजनी धरणग्रस्त शेतकरी करीत आहेत. मात्र, त्यापुढेही पाण्याची पातळी बेसुमार वापराने घटतच राहिली.

50 वर्षांपूर्वीचे मूळ नदीचे पात्र दिसू लागले

आजअखेर निर्मितीनंतर उजनी धरण पहिल्यांदाच नीचांकी पातळीत गेल्यामुळे अनेक ठिकाणी गावोगावी 50 वर्षांपूर्वीचे मूळ नदीचे पात्र दिसू लागले आहे. तसेच उजनीत गडप झालेल्या गावांचे अवशेष, काही प्राचीन मंदिरे, वाडे पाण्याबाहेर पडले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news