Pune Politics: ठाकरेंच्या माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा अन् भाजपात नाराजी

Political News: पदाधिकार्‍यांसह इच्छुकांना विश्वासात न घेतल्याची तक्रार
Political News
ठाकरेंच्या माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा अन् भाजपात नाराजीPudhari
Published on
Updated on

पुणे: शिवसेना ठाकरे पक्षातून पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या माजी नगरसेवकांना पक्षात घेताना विश्वासात न घेतल्याने पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळेच रविवारी होणारा नियोजित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे महापालिकेचे शिवसेनेचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट, या पाच माजी नगरसेवकांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मात्र, आता या पाच जणांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. प्रामुख्याने या पाच जणांमुळे संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवर टांगती तलवार उभी राहिली आहे.

पक्षासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काम केल्यानंतर आता महापालिकेसाठी उमेदवारी मिळण्याची आशा असतानाच या पाच जणांमुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याने या इच्छुकांकडून पक्षसंघटनेतील पदाधिकार्‍यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधितांना पक्षात घेऊ नये, अशीही मागणी होत आहे. तर, दुसरीकडे या पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेताना पक्षातील काही नेत्यांबरोबरच संघटनेतील नेत्यांनाही विश्वासात घेतले गेले नसल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हे पदाधिकारी संबंधित पाच जणांना पक्षात घेण्याबाबत नाराज असल्याचे समजते. त्यामुळे रविवारी होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबला. या पाच जणांचा पक्षप्रवेश मंगळवारी (दि. 7) मुंबईत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

इच्छुकांची रांग असताना प्रवेश का?

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मनसेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नगरसेवकांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यात आली होती. त्या वेळेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपला फोडाफोडीचे राजकारण करावे लागले होते. त्यामधील बहुतांश सर्वजण पुन्हा विजयी झाले. त्यामुळे महापालिकेत भाजपला मोठे बहुमत मिळाले होते.

दरम्यान, आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. भाजपकडे इच्छुकांची मोठी रांग आहे. त्यातच महापालिकेची पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात सक्षम उमेदवार आहे की नाही, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार? हेही निश्चित नाही. असे असतानाही पाच माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची घाई का? असा प्रश्नच काही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला.

नक्की गरज कोणाला?

शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या पाच माजी नगरसेवकांपैकी केवळ एक किंवा दोन यांचीच त्यांच्या भागात ताकद आहे. त्यामुळे सेनेतूनसुद्धा ते पुन्हा निवडून येऊ शकतात. अन्य नगरसेवकांना पुन्हा निवडून येण्यासाठी भाजपच्या ताकदीची आवश्यकता आहे. त्यामुळे या माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन नक्की भाजपचा फायदा होणार आहे की या माजी नगरसेवकांचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news