

Bangladeshi illegal stay in Karegaon Pune District
टाकळी भीमा : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१२) पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. कमरोल रमजान शेख (वय 32), अकलस मजेद शेख (वय 39), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय 35) जाहिद अबूबकर शेख (वय 30) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे असून ते बांगलादेशच्या निरनिराळ्या जिल्ह्यातील राहणारे आहेत. पुणे ग्रामीण पोलीसांच्या दहशतवाद विरोधी शाखेचे अंमलदार मोसिन बशीर शेख यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी (दि.११) संध्याकाळी ६.३० ते रात्री ११.३० चे दरम्यान ग्राम कारेगाव (ता. शिरूर) येथे वरील चार बांगलादेशी हे अवैधपणे भारतात घुसखोरी करून बनावट आधार कार्ड धारण करून अनधिकृतपणे मागील दोन वर्षांपासून वास्तव्य करत असलेले आढळून आले आहे. अंमलदार मोसीन शेख यांना गोपनीय बातमीदारात ही माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये वरील चार बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करताना मिळून आले,त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी कस्टडी देण्यात आली आहे, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस ठाणे महादेव वाघमोडे व दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, सहाय्यक उपनिरीक्षक,हवालदार दत्तात्रय शिंदे विशाल भोरडे, रवींद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओमकार शिंदे, योगेश गुंड, संतोष साळुंखे, आकाश सवाने यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.