प्रज्ञा केळकर-सिंग
यावर्षी राज्यात साडेपाच लाख नागरिकांना श्वानदंश झाला आहे. माणसाला कुत्रा चावल्यास तातडीने रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जाते. महापालिका, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून स्थानिक पातळीवर लसींची खरेदी केली जाते. त्यामुळे राज्यात किती रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण झाले, याची आकडेवारीच आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही.
रेबीज हा जीवघेणा आजार असून, एखाद्या व्यक्तीला प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीज झाल्यास मृत्यूचाही धोका संभवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 150 देशांमध्ये 59 हजार लोक रेबीजमुळे आपला जीव गमावतात. यातील सर्वाधिक मृत्यू आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये होतात. आकडेवारीनुसार, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे 60 हजार रेबीज प्रतिबंधात्मक लसींची गरज भासते. महापालिका, जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवर निविदा काढून लसींची खरेदी केली जाते. सध्या एका इंजेक्शनची किंमत साधारणपणे 200 रुपये असल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
कसे होते श्वानदंशावर लसीकरण?
रेबीजचा विषाणू मज्जारज्जूमधून पुढे जातो. विषाणूच्या प्रवासाचा वेग जास्त असल्यास धोका वाढतो. कुत्र्याची नखे लागल्याने झालेली किरकोळ जखम, खरचटणे, मध्यम, जखम अशा स्थितीमध्ये रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे 3 किंवा 5 डोस दिले जातात. यामध्ये 0, 7, 14, 28 अशा दिवसांचे अंतर आवश्यकतेनुसार ठेवले जाते. जखम खोल असेल किंवा मेंदूपासून जवळ असलेल्या अवयवाला श्वानदंश झाल्यास अँटीबॉडी वेगाने तयार व्हाव्यात, यासाठी जखमेच्या जागी इंजेक्शन दिले जाते.
कुत्र्यांमधील रेबीज लसीकरण
कुत्र्यांमध्ये रेबीजची लागण झाली असल्यास नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यासाठी कुत्र्यांना दरवर्षी रेबीज प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस दिले जातात. त्यानंतर दरवर्षी 1 डोस दिला जातो. जखमेनुसार उपचारांची दिशा ठरवली जाते.