इंदापुरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालकावर गोळीबार

युवक गंभीर जखमी; आरोपीला अटक
firing
गोळीबारPudhari
Published on
Updated on

बारामतीमधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केला, यामध्ये पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणारा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राहुल अशोक चव्हाण (वय 30, रा.र शिरासोडी,ता. इंदापूर)असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. बारामतीत विद्यार्थ्यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली, तर सायंकाळी इंदापूर शहरातील महाविद्यालयासमोरच ही गोळीबाराची घटना घडल्याची बातमी इंदापूर शहर तालुक्यात पसरल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.

सोमवारी सायंकाळच्या दरम्यान शहरातील जुन्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या समोरून हा पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण चालवणारा युवक महाविद्यालयातून बाहेर पडत दुचाकीवर बसताना दुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या एकाने आपल्या जवळील रिव्हॉल्व्हरमधून चार गोळ्या चव्हाणवर झाडल्या आणि तो दुचाकीवरून तोंड बांधून वेगात गाडी चालवत सोलापूरच्या दिशेने पसार झाला आहे.

घटना घडताच इंदापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमी चव्हाण यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गोळीबाराचा हा प्रकार हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, यातील आरोपीला पकडण्यासाठी दोन पथके तैनात करून आरोपीचा शोध सुरू आहे.

रात्री बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी हल्ल्यातील जखमी युवकाची चौकशी केली तपास गतीने करण्याच्या सूचना इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिल्या.

इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासांत वालचंदनगर येथून ताब्यात घेतले. या घटनेनंतर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. याचवेळी वालचंदनगर येथून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी धीरज ऊर्फ सोन्या चोरमले शिरसोडी गावातीलच रहिवासी असून, जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. आरोपीकडून पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news