

Rocket causes Fire Fursungi Pune
पुणे : फुरसुंगी रस्त्यावरील एका उंच इमारतीत दहाव्या मजल्यावरील गॅलरीत फटाक्याचे रॉकेट पडून पडदा पेटल्याने सदनिकेत आग लागल्याची घटना सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा घडली. या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणानिमित्त फटाके फोडण्याच्या उत्साहात काही नागरिकांनी उंच इमारतींच्या परिसरात रॉकेट फोडले. त्यापैकी एक रॉकेट दहाव्या मजल्यावरील गॅलरीत जाऊन पडले. त्यामुळे पडदा पेट घेतला आणि काही क्षणांत गॅलरीतील भागात आग पसरली. त्यामुळे काही साहित्य जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अल्पावधीतच आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाके फोडताना विशेष काळजी घ्या. उंच इमारतींच्या आसपास रॉकेट किंवा आकाशबाण उडवू नयेत. सुरक्षित जागी फटाके फोडा आणि अग्निसुरक्षेचे नियम पाळा, असे आवाहन पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.