वारुळवाडी येथील अर्बन फार्म्सच्या गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

वारुळवाडी येथील अर्बन फार्म्सच्या गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे नुकसान

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : वारुळवाडी येथील कंपोस्ट कल्चर खत तयार करणार्‍या अर्बन फार्म्स कंपनीच्या गोडाऊनला आग लागून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी साठा केलेले उसाचे पाचट व अन्य पालापाचोळा जळून खाक झाला. यामध्ये कंपनीचे सुमारे 20 लाख रुपयांच्या कच्च्या मालाचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिक व विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे अग्निशमन दल यांच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

याबाबत माहिती अशी की, वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गालगत अभिषेक विलास भुजबळ यांच्या सर्वे नंबर 62 मधील शेतात उसाचे पाचट, पालापाचोळा, वाळलेले केळीची खुंटे व अन्य वनस्पतींचे अवशेष यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्याचा अर्बन फार्म्स हा कारखाना आहे. कंपनीने कारखाना परिसरात कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणारे उसाचे पाचट व अन्य कच्च्या मालाचा साठा करून ठेवला होता. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाचटाला आग लागली. सुटलेला वारा व तापमानात झालेली वाढ यामुळे काही काळातच आग पसरली.

वारुळवाडी गावचे पोलिस पाटील सुशांत भुजबळ, भरत मुठे, नारायण भुजबळ, सूरज भुजबळ, कुणाल भुजबळ, अंबादास भुजबळ, अभिषेक भुजबळ, वैभव भुजबळ या स्थानिकांनी पंप सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंब रस्त्यात मध्येच बंद पडला. त्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंब, गुरुप्रसाद सर्व्हिसचा टँकर मागवण्यात आला. पाण्याचा फवारा मारून सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीची तीव—ता कमी करण्यात यश आले. दरम्यान, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी ठेवण्यात आलेला 80 टक्के कच्च्या मालाचा साठा जळून खाक झाला. यामुळे कंपनीचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news