पुणे: देवगड हापूस आंब्याच्या नावाने बाजारात बनावट आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी अस्सल देवगड आंब्यांवर युनिक आयडी कोड लावण्यात येणार असून, प्रत्येक आंब्यावर हा कोड असणार आहे.
त्यामुळे ग्राहकांना बनावट आणि खरा देवगड हापूस आंबा ओळखणे सोपे होणार आहे, अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक अॅड. ओंकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी सभासद नचिकेत भिडे, सन सोल्युशन्सचे प्रशांत यादव या वेळी उपस्थित होते.
देवगड अल्फोन्सोच्या (हापूस) नावाने बाजारात बनावट व निकृष्ट दर्जाच्या आंब्यांची विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे देवगडमधील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे रोखण्यासाठी हापूसच्या भौगोलिक संकेत (जीआय) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टँपर प्रूफ यूआयडी सील सक्तीचे करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असून, आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा टँपर प्रूफ यूआयडी सील स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे.
यूआयडी असलेले आंबेच देवगड हापूस किंवा देवगड अल्फोन्सो म्हणून विक्री करता येणार आहेत. या उपक्रमामुळे देवगड हापूस आंब्यांच्या नावाखाली होणारी बनावट आंब्यांची विक्री बंद होईल. ग्राहकांना केवळ जीआय प्रमाणित अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
देवगड तालुक्यातील हापूस आंबा गेल्या शतकाहून अधिक काळ आपल्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे. त्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे 80 टक्क्यांहून अधिक आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत.
त्यामुळेच हापूसच्या (अल्फोन्सो) जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणार्या अधिकारांचा वापर करून संस्थेने टँपर प्रूफ यूआयडी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टँपर प्रूफ यूआयडी सीलचे पेटंट असलेल्या मुंबई येथील सन सोल्युशन्स संस्थेबरोबर करार केला असल्याचे अॅड. सप्रे यांनी सांगितले.
शेतकर्यांना यूआयडी स्टिकर वितरित
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकर्यांना त्यांच्याकडील आंब्यांच्या झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार टँपर प्रूफ यूआयडी सील वितरित केले आहेत. शेतकर्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा यूआयडी स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे.