लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्यात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली असून, सध्या दहा किलो कांद्याला 120 ते 140 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाची भीतीमुळे शेतकरी बराखीत कांदा साठविण्यासाठी धावपळ करीत आहेत.
एका बाजूला कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्यांनी केलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने व सध्या अवकाळी पावसाची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चाळीत कांदा साठवणूक करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आठ दिवसांपासून दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण तयार होते. अधूनमधून ढगांचा गडगडाटही होतो. त्यामुळे कांदा काढणी करणार्या शेतकर्यांच्या काळजीत भर पडत आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने काही शेतकरी कांदा लवकर काढत आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्यापेक्षा आणि बाजार उतरले असले, तरी निदान दोन पैसे कष्टाचे मिळतील, ही शेतकर्यांची मानसिकता आहे.
मजुरीचे दर वाढल्याने कांदा उत्पादक त्रस्त
अवसरी बुद्रुक, निरगुडसर, देवगाव, लाखनगाव, काठापूर बुद्रुक, पोंदेवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर या भागांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा काढणी जोरात सुरू आहे. पण, कांदा काढणीसाठी अवाच्या सव्वा मजुरी द्यावी लागत आहे. कारण, सर्वत्र कांदा काढणी सुरू असल्याने जोडप्याला 800 ते 900 रुपये एका दिवसाची मजुरी द्यावी लागत आहे. शिवाय कामगारांना छत्री व थंड पाण्याचा जारसुद्धा द्यावा लागत आहे. मजुरांना ने-आण करण्यासाठी पिकअपची सोय करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.