

Fathers Day 2025 Pune Senior Citizen
पुणे: काही वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाले... मुलगा कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक... यामुळे काकांचे आयुष्य एकाकी झाले... कोणी बोलायला नाही, तर कोणी जगण्याचा आधार नाही... मुलाशी फक्त व्हिडीओ कॉलवर संवाद... पण, थकलेल्या आयुष्यामुळे आरोग्याच्या समस्या अन् कामे करण्यात अडचणी...
एकटेपणामुळे त्यांच्या जगण्यातला आनंद हरवला आहे... ही कहाणी आहे एकाकी आयुष्य जगणार्या 75 वर्षीय अरुण कुलकर्णी (नाव बदलले आहे) यांची... आज अरुण यांच्याप्रमाणे कित्येक वडील आहेत ज्यांना उतारवयात एकटेपणाचे आयुष्य जगावे लागत आहे. मुलांसोबतच्या आनंदी जगणे वाट्याला कधी येणार? याची आशा उतारवयातील या वडिलांना आहे.
महाराष्ट्रात अंदाजे 1 कोटी 40 लाखहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. पुण्यात 9 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून, त्यात 6 ते 7 हजारांहून अधिक ज्येष्ठ हे एकाकी आयुष्य जगत आहेत. त्यात 60 टक्के एकाकी ज्येष्ठ पुरुषांची संख्या आहे. अनेक कारणांमुळे या ज्येष्ठ पुरुषांना एकाकी आयुष्य जगावे लागत आहेत.
त्यातील प्रमुख कारण म्हणजे मुलांचे परदेशात वास्तव्य. यामुळे बहुतांश वडिलांना मुलांविना आयुष्य जगावे लागत असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा एकाकी आयुष्य जगणार्या वडिलांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. मुलांसोबतच्या जगण्याचा शोध घेणार्या अशाच काही ज्येष्ठांशी दै. ‘पुढारी’ने रविवारी (दि. 15 जून) साजरा होणार्या ‘जागतिक पितृदिना’निमित्त (फादर्स डे) संवाद साधला.
सुरेश (नाव बदलले आहे) म्हणाले, माझी दोन्ही मुले परदेशात राहतात. माझ्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मी गेल्या दहा वर्षांपासून एकटा राहत असून, एकटेपणाचे जगणे हे खूप दु:खदायक आहे. वय झाल्यामुळे घरची कामे करण्यात अडचणी येतात. मुले मला परदेशात राहायला बोलवतात. पण, माझे घर आणि सर्व काही पुण्यात असल्यामुळे हे सोडून तिथे जाता येत नाही. त्यामुळे मुलांशी, नातवांशी व्हिडीओ कॉलवर संपर्क होतो. पण, हे पुरेसे नाही. कारण सतत त्यांची आठवण येते. मुलांचेही आयुष्य आहे, करिअर आहे. त्यामुळे एकटेपणाचे जगणे मी स्वीकारले आहे.
केअर गिव्हर्स बनलेत आधार
पुण्यामध्ये एकाकी ज्येष्ठ पुरुषांची संख्याही वाढत आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा ज्येष्ठांना आधार मिळतोय तो फेस्कॉमच्या ‘केअर गिव्हर्स’चा. आम्ही शंभर जणांना प्रशिक्षण दिले आहे. हे सर्वजण एकाकी ज्येष्ठांना आरोग्यासह विविध गोष्टींसाठी मदत करतात. एकाकी आयुष्य जगणार्या ज्येष्ठांना यामुळे आधार मिळाला आहे, असे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) माजी अध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितले.
एल्डर लाइन 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाइन 2021 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 4 लाख 50 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. त्यांच्या समस्यांची दखल घेत, ज्येष्ठांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचे भावनिक समुपदेशन करण्यासाठी ही हेल्पलाइन कार्यरत आहे. ज्येष्ठांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, मदतीसाठी योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करतो.
- स्मितेश शहा, प्रकल्प व्यवस्थापक, एल्डर लाइन 14567 महाराष्ट्र राज्य