चाकण: चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक 5 मध्ये भूसंपादन, परतावा आणि अनेक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे. याबाबत बाधित 2 हजार 631 खातेदार शेतकर्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 24) झाली. या वेळी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उत्तरे दिले.
तसेच एमआयडीसी प्रशासनाला पारदर्शी कारभाराच्या सक्त सूचना दिल्या. शेतकर्यांच्या सर्व प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने खेड तालुक्यात 1 ते 10 एप्रिलदरम्यान मेळावा घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याचे आदेश त्यांनी खेडचे प्रांत आणि एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिले.
चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक 5 मधील भूसंपादन आणि नुकसानभरपाई तसेच शेतकर्यांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानक बैठक रद्द करण्यात आल्याचे संबंधित शेतकर्यांना पुण्यात पोहचल्यानंतर सांगण्यात आले.
त्यानंतर शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या ठिकाणी खेडचे आमदार बाबाजी काळे पोहचले. त्यांनी थेट जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यांना बैठक रद्द न करता शेतकर्यांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीस स्वतः जिल्हाधिकारी उपस्थित होते.
दलाल आणि भ्रष्ट अधिकार्यांना बाजूला ठेवून पात्र 1 हजार 167 खातेदारांना प्रथम परतावा व जागा वाटप करावे. याआधी तालुक्यात काही एजंट मंडळींचा कारभार होता तो आता मी खपवून घेणार नाही, असे आमदार काळे यांनी सांगितले.
यावर जिल्हाधिकारी डुडी यांनी 1 एप्रिल ते 10 एप्रिलदरम्यान बाधित परतावापात्र शेतकर्यांचा चाकण नगरपरिषद येथे मेळावा घेण्याचे आश्वासन दिले. मोफत परतावा व जमिनींचे वाटप करावे, त्रुटी असतील तर त्या जागीच सोडवून घ्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी उपविभागीय अधिकारी, खेड व प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, पुणे यांना दिले. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयामुळे परताव्याच्या जमीन व्यवहारातील दलाल लोकांचे धाबे दणाणले आहे.