

पुणे : कृषी कर्जमाफीच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण होत आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिन्याच्या आत निर्णय घेतील. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामधून आधार मिळेल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. पंचनामे झाले आहेत, त्याप्रमाणे भरपाई मिळेल. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आले नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नसल्याने तांत्रिक अडचण होती. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये त्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान मिळेल आणि त्यानंतर अध्यक्षपद मिळू शकेल, तर नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर ‘अल निनो’संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणींवर विचारमंथन केले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकरी उपयोगी योजना आणल्या जातील, असेही भरणे यांनी सांगितले.