

पुणे : शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून आर्थिक लाभाच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी चार गुन्ह्यांत तब्बल 67 लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
एका कंपनीत उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची सायबर चोरट्यांनी सहाशे टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 51 वर्षीय उपमहाव्यवस्थापक महिलेच्या तक्रारीवरून खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला ही ईऑन आयटी पार्कजवळील फॉरेस्ट काउंटी येथे राहते. 8 मे रोजी ती घरी असताना तिच्या मोबाईलवर ’मार्गा पिलीप’ नावाच्या व्यक्तीचा व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्याने महिलेला आपण युरोपमध्ये आयपीओ कन्सल्टंट म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले, तसेच मोठ्या कंपन्यांशी संबंध असल्याचेही नमूद केले. त्यानंतर त्याने तिला 106 सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले.
त्यानंतर एका आयपीओ गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देत 600 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 18 लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार 8 मे 2025 ते 13 जून 2025 दरम्यान घडला.
दरम्यान, बाणेर परिसरात राहणार्या 39 वर्षीय तरुणाला ’शेअर्स ट्रेडिंग’विषयी ऑनलाइन माहिती देत सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याला विविध खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. या प्रकारातून तक्रारदाराकडून तब्बल 35 लाख 13 हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, त्याला कोणताही नफा देण्यात आलेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार 22 फेब—ुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत घडला.
तिसरा गुन्हा चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. यामध्ये सायबर चोरट्यांनी गोखलेनगरमध्ये राहणार्या 45 वर्षीय महिलेशी टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांनी तिला विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. तिने हे टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला तिला काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. मात्र, नंतर तिच्याकडून वेळोवेळी सव्वासात लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी मोबदला देणे थांबवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल चौथ्या गुन्ह्यात सायबर चोरट्यांनी पैसे परत करण्याच्या बहाण्याने 64 वर्षीय महिलेच्या मोबाईलचा ऑनलाइन ताबा मिळवला आणि तिच्या खात्यातून तब्बल पाच लाख 97 हजार रुपये काढून घेतले. ही फसवणूक 5 जून ते 6 जून 2025 या कालावधीत घडली.