पुणे: दुसर्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत अनेक उमेदवार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. परंतु, बर्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीच्या दुसर्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी 20 जानेवारीपासून पोर्टल व सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आत्तापर्यंत राज्यातील 1 हजार 216 व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण 1 हजार 337 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिक्षण विभागातर्फे 20 जानेवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, बर्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना शिक्षण विभागाने आवाहन केले आहे की, आपल्या अधीनस्त शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.
पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांनी edupavitra2022 gmail. com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.