रिक्षा स्टँडमधील रिक्षाचालकांची बसस्थानकातून हकालपट्टी; रिक्षाचालक संतप्त

परिवहन राज्यमंत्री, खासदारांकडे मागणार दाद; आंदोलनाचाही इशारा
Pune News
रिक्षा स्टँडमधील रिक्षाचालकांची बसस्थानकातून हकालपट्टी; रिक्षाचालक संतप्त Pudhari
Published on
Updated on

पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर एसटी प्रशासन आता अलर्ट मोडवर असून, परिसराच्या स्वच्छतेसह स्थानकात अनधिकृत घुसखोरी करणार्‍या वाहनांना लगाम लावत आहेत. मात्र, शनिवारी (दि. 8) स्थानकात एका बाजूला असलेला रिक्षा स्टँडमधील रिक्षांची देखील एसटी प्रशासनाने हकालपट्टी केली. त्यामुळे शनिवारी स्वारगेट येथे रिक्षा आणि एसटीचा वाद पेटल्याचे पाहायला मिळाले.

शनिवारी सकाळच्या सुमारास एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी येऊन स्थानकात स्टँडला असलेल्या रिक्षा बाहेर काढल्या, असा आरोप येथील रिक्षाचालकांनी केला आहे. स्वारगेट परिसरात मेट्रोच्या कामामुळे रिक्षाचालकांचा येथील पूर्वीचा थांबा हलवून स्वारगेट स्थानकाच्या सातारा रस्त्याकडील प्रवेशद्वारात देण्यात आला होता.

गेली काही वर्षे येथून रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करत होते. मात्र, बलात्कार प्रकरणानंतर शनिवारी एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कडक पवित्रा घेत रिक्षा बाहेर काढल्याचे समजले. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, याबाबत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि केंद्रीय हवाईमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाद मागणार आहे. तरीही न्याय मिळाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असे रिक्षाचालकांनी या वेळी बोलताना सांगितले.

स्वारगेट स्थानकातील रिक्षाचालक काय म्हणतात...

याबाबत रिक्षाचालकांशी संवाद साधल्यावर रिक्षाचालक म्हणाले, आमच्या रिक्षांना स्वारगेट स्थानकात लावण्यास तत्कालीन मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी तोंडी परवानगी दिली होती. मेट्रोच्या कामामुळे आमचा येथील बाहेरचा पूर्वीचा थांबा हटवण्यात आला. आता आम्हाला थांब्यासाठी जागाच नाही, एस.टी.नेही आम्हाला बाहेर काढले. आता आम्ही जायचे कुठे? आम्ही लांब गेलो तरी एस.टी.ने येणार्‍या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांची फरपट होणार आहे.

स्वारगेट एस.टी. स्थानकात आम्ही शनिवारी सकाळी पाहणी केली. या वेळी रिक्षाचालकांच्या रिक्षा बाहेर हाकलण्यात आलेल्या नाहीत. रिक्षाचालकांनी या वेळी परिसरात वाकड्या-तिकड्या रिक्षा लावल्याचे पहायला मिळाले. वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता त्यांना रिक्षा एका बाजूला कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने लावण्याच्या सूचना केल्या.

- प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, एस.टी., पुणे विभाग

एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शनिवारी सकाळी आमच्या रिक्षा स्वारगेट स्थानकातून बाहेर हाकलल्या. बाहेरील बाजूस मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे स्थानकामध्ये कोपर्‍याला रिक्षा लावण्यास तत्कालीन मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी तोंडी परवानगी दिली होती. मेट्रोचे काम अजूनही सुरू आहे. एसटी प्रशासनाने अशा प्रकारे आमच्या रिक्षाचालकांना बाहेर हाकलून त्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम सुरू केले आहे. मेट्रोचे काम संपेपर्यंत स्वारगेट स्थानकाच्या अंतर्गत एका बाजूला रिक्षा थांबवण्यास परवानगी द्यावी, काम पूर्ण झाल्यावर आम्ही आमच्या पूर्वीच्या जागी जाऊ, आम्हाला स्वारगेट स्थानकात जागा न दिल्यास आम्ही बुधवारपासून आंदोलनाला बसणार आहे.

- बापू भावे, खजिनदार, रिक्षा फेडरेशन, सल्लागार, स्वारगेट इन गेट एसटी स्टँड रिक्षा संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news