

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाची तीर्थक्षेत्र व औद्योगिकनगरी, अशी ओळख असल्याने लाखो भाविक, कामगार आणि ग्रामस्थांना प्रवासासाठी एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना जेजुरी रेल्वे स्टेशनला थांबा मिळावा, अशी मागणी जेजुरीच्या माजी नगरसेविका अमीना पानसरे तसेच जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यांमधून लाखो भाविक खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरीला येतात. जेजुरी रेल्वे स्टेशनमध्ये काही गाड्या थांबतात. मात्र, एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे भाविक, कामगार यांना पुणे किंवा सातारा रेल्वे स्टेशन येथे उतरून एसटी बसने अथवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
कोल्हापूर-निजामुद्दीन एक्स्प्रेस, अजमेर-बंगळुरू एक्स्प्रेस, पाँडिचेरी एक्स्प्रेस, जोधपूर-मंगलोर एक्स्प्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, लोकमान्य हुबळी एक्स्प्रेस, चंदीगड यशवंतपूर एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, दादर-म्हैसूर एक्स्प्रेस या दहा गाड्या जेजुरी रेल्वे स्टेशन येथून धावतात. मात्र, या गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांना या गाड्यांचा लाभ घेता येत नाही.
याशिवाय मोरगाव हे अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थस्थळ आहे, जे जेजुरी रेल्वे स्थानकापासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच जेजुरी हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले आहे. येत्या काही वर्षांत जेजुरीजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे.
येथील एमआयडीसीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर किमान गोवा एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि इतर काही गाड्यांना थांबे दिल्यास भाविक, कामगार व प्रवाशांना त्याचा फायदा होऊन रेल्वेचे उत्पन्न देखील वाढणार आहे.
मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक प्रमुख धर्मवीर मीना, पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी मंगळवारी (दि. 11) जेजुरी रेल्वे स्टेशनला भेट दिली. या वेळी माजी नगरसेविका अमीना पानसरे, जेजुरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, सामाजिक कार्यकर्ते राजू पानसरे यांनी या अधिकार्यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले.