पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सध्याच्या कात्रज मुख्यालयातील जमिनीवर राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाह्यातून व त्यांच्या माध्यमातून डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. संघाच्या या जमिनीवर पुणे मनपाचे बहुउद्देशीय कामांसाठीचे (एमपीजी-1) असलेले आरक्षण रद्द झाल्याने आता मूळ डेअरी विस्तारीकरण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कात्रज दूध संघाचे कामकाज चालते आणि संघाचा अध्यक्ष म्हणून मला ऑक्टोबर 2023 ते फेब—ुवारी 2025 या काळाची कारकीर्द भूषविता आली. दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने संघाच्या हिताला प्राधान्य दिल्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संघाच्या नफ्यामध्ये अडीच कोटींनी वाढ झाली तसेच सुमारे तीन कोटींइतका नफा झाल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संघाच्या कोंढापुरीमध्ये असलेला पशुखाद्य कारखान्यातील पशुखाद्याची गुणवत्तावाढ व मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पशुखाद्याच्या विक्रीत 150 मेट्रिक टनावरून वाढ होऊन प्रतिमहिना ही विक्री 500 मेट्रिक टनापर्यंत वाढविली. संघाचे पशुखाद्य खरेदी करणार्या दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर दीड रुपयाप्रमाणे एक कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले.
सन 2023-24 मध्ये दूध उत्पादक शेतकर्यांना दूध दरफरक प्रतिलिटरला दोन रुपयांप्रमाणे 12 कोटी 50 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. शासनाच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेतून दोन कोटींचे अनुदान संघाच्या दूध उत्पादक शेतकर्यांना मिळू शकले. याशिवाय संघातील 333 सेवकांना विविध पदावंर पदोन्नती देण्यात आली आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन कोटी रुपये हे कात्रज दूध संघाच्या सीमाभिंतीसाठी मंजूर करण्यात आल्याचे पासलकर यांनी सांगितले.