…हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते: मंत्री मुरलीधर मोहोळ

पुढारी’चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुलाखत घेतली.
पुढारी’चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुलाखत घेतली.
[author title="प्रशांत वाघाये" image="http://"][/author]
नवी दिल्ली :  मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले आणि पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सहकार आणि विमान वाहतूक विभागाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळाली. पुणे लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना ही जबाबदारी मिळणे अपेक्षित होते का? केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत काम करण्याची संधी, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, केंद्रीय मंत्री म्हणून पुणे, महाराष्ट्र आणि देशासाठी काम करताना त्यांचे काय व्हिजन आहे? या सगळ्या गोष्टींसंदर्भात त्यांनी सर्वात आधी 'पुढारी'शी सविस्तर संवाद साधला. 'पुढारी'चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत…
प्रश्न: गणेश मंडळाचा कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री… या प्रवासात मागे वळून पाहताना काय भावना आहेत?
मुरलीधर मोहोळ: गेल्या 30 वर्षांचा हा माझा सामाजिक राजकीय प्रवास आहे. यासाठी सर्वप्रथम मी पक्षाचे, पक्षनेतृत्वाचे आभार व्यक्त करतो. 4 वेळा महापालिकेत आणि आता लोकसभेला मला पुणेकरांनी निवडून दिले आहे. पक्षाबद्दल, पक्ष नेतृत्वाबद्दल, कार्यकर्त्यांबद्दल, पुणेकरांबद्दल मी कृतज्ञ आहे. बूथस्तरावरचा कार्यकर्ता, गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केले आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. कार्यकर्ता म्हणून मतदार यादी तपासणे, भिंती रंगवणे, फलक लावणे, चिठ्या वाटणे अशा सगळ्या कामांचा अनुभव घेतला आहे, अनेक चढ उतार आले. यातून अनेक गोष्टी शिकलो. 30 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज इथवर आला आहे. एका छोट्या कार्यकर्त्याला देशाचा मंत्री बनवणे हे फक्त भाजपमध्ये होऊ शकते. आजवरच्या या प्रवासाचे समाधान नक्की आहे. आता मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे.
प्रश्न: पुण्याच्या खासदाराला 3 दशकांहून अधिक काळानंतर मंत्रीपद मिळाले, केंद्रीय मंत्रीपद त्यातही सहकार आणि नागरी उड्डाण अशी खाती अपेक्षित होती का?
मुरलीधर मोहोळ: हे सगळं अनपेक्षित आहे, मुळात मी मंत्री होणार हेच अनपेक्षित होतं, त्यामुळे खाती कुठली मिळणार हा प्रश्नच नव्हता. एक कार्यकर्ता म्हणून आजवर जी जी जबाबदारी मिळत गेली. त्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यात नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यासोबतच पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी आणि राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली. त्यानंतर आता खूप मोठी संधी आहे, पुण्यासह महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याची संधी पक्षाने आणि पुणेकरांनी दिली आहे, त्यालाही प्रामाणिकपणे न्याय देणार आहे.
प्रश्न: तुम्ही पुण्याचे महापौर होता, नेमका तेव्हा कोरोना काळ होता. त्या कठीण परिस्थितीत शहर हाताळलं, महापौर परिषदेत देशपातळीवर काम केले, हे काम मंत्रिपद मिळवून देण्यात उपयोगी ठरले?
मुरलीधर मोहोळ: स्वाभाविक आहे! तुम्ही काय करता, कसे वागता, तुम्हाला मिळालेल्या जबाबदारीला न्याय देतो का, लोकांसोबत संवाद- समन्वय आहे का, तुम्ही केलेलं काम लोकांना आवडलं का, तुम्ही कुठे कमी पडत आहात का, हे निवडणुकीत कळते. कोरोना काळात शहराचा प्रथम नागरिक म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून काम केले. ते केवळ मिरवण्याचे पद नव्हते, माझ्या शहराचा पालक म्हणून मी त्या जबाबदारीकडे बघत होतो. 60 लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरातील प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणं, ही सगळ्यात मोठी जबाबदारी होती. मी फिल्डवर नसतो तर यंत्रणेने काम करताना विचार केला असता, मी थांबलो असतो तर यंत्रणा ठप्प पडली असती. माझ्यासह संपूर्ण यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था, महापालिका अधिकारी कर्मचारी या सर्वांचे हे सामूहिक यश होतं. तसेच महापौर परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मी महापौर असताना नगर विकास मंत्रालयाद्वारे महापौर परिषदेचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आणि देशातील सर्व महापौरांसमोर देशातील केवळ दोन महापौरांना बोलण्याची संधी मिळाली, त्यापैकी मी एक होतो. त्यामध्ये स्वच्छता, आरोग्य यावर मला बोलायचे होते. स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणेत शहरातील नागरिकांचा सहभाग, घनकचरा व्यवस्थापन यावर मी बोललो. या निमीत्ताने देशपातळीवर बोलण्याची आणि पुण्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. तो एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण होता. कदाचित या सगळ्यांचे मुल्यमापन कुठे तरी कळत नकळत होत असते.
प्रश्न: देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे. याचा फायदा तुम्ही महाराष्ट्रासाठी कसा करून घ्याल, यासाठी काय तुमचं व्हिजन आहे?
मुरलीधर मोहोळ: महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे, सहकार हा राज्याचा आत्मा आहे. देशात सहकार क्षेत्रात जेवढया संस्था आहेत, त्यापैकी जवळपास 25% संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात महाराष्ट्रात आणि देशात समाजातील शेवटच्या माणसापर्यंत काम करायला खूप वाव आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची मला संधी आहे, मी त्यांना आदर्श म्हणून बघत आलो, त्यांना भेटणे म्हणजे एक पर्वणी असायची, आता मला त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे. मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो, यातून मला खूप शिकायला मिळणार आहे, मी खूप आनंदी आहे, थोडे दडपणही आहे. कारण कामात कुठे चूक व्हायला नको, तिथे योग्य दिशेने काम झाले पाहिजे, त्यांच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या आहेत. सहकारातून समृद्धीकडे हा एक मंत्र आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी, उसतोड कामगार, साखर कारखाने, दुग्ध उद्योग या सर्व गोष्टींसह सहकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व ठिकाणी काम करण्याची ही खूप मोठी संधी आहे. त्यानुसार सहकाराच्या माध्यमातून देशहिताच्या, शेतकऱ्यांच्या आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या अपेक्षांचा विचार करून त्या पुर्ण करण्याचे काम करायचे आहे.
प्रश्न: पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचं मोठं जाळं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि अजित पवारांच्याही राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहेत, भाजपने तुमच्या रूपाने त्यांवर नजर ठेवता यावी किंवा त्या संस्था पुढे भाजपच्या ताब्यात याव्यात यासाठी तुम्हाला या खात्याचे राज्यमंत्री म्हणून निवडलं असं वाटतं का?
मुरलीधर मोहोळ: मला असा कुठला अँगल वाटत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, एकदा तुम्ही निवडून आलात की तुम्ही सर्वांचे होतात. त्यामुळे देशाचे सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. त्यातल्याच सहकार आणि नागरी विमान वाहतूक या दोन खात्यांचा राज्यमंत्री म्हणून मी काम करणार आहे. निवडणुका एका दिवसाच्या असतात, महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून समृद्ध करायचा आहे. आणि त्यासाठी मला काय योगदान देता येईल, जास्तीत जास्त काम कसे करता येईल, हा विचार मी करत आहे. आणि सहकारी संस्था केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत, असे नाही. भाजपच्याही ताब्यात गावपातळीपासून जिल्हा बँकेपर्यंत अनेक सहकारी संस्था आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहकारात प्रचंड मोठे काम केले आहे. आणि आम्ही सरकार म्हणून काम करणार आहोत, देशातील प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आमचे सरकार म्हणून कर्तव्य आहे.
प्रश्न: पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न गेले काही वर्षे प्रलंबित आहे, पुरंदरमध्ये नव्या विमानतळाचा विषय आहे, तुमच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील का?
मुरलीधर मोहोळ: अर्थातच! केंद्र सरकार म्हणून आम्ही देशासाठी काम करणार आहोत. मात्र आपण जिथून येतो तिथे प्रकर्षाणे लक्ष घालावे लागले. शेवटी एक प्राधान्यक्रम असतो. पुणे, नवी मुंबई, पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात कामाला गती देणे, जमीन अधिग्रहण करणे, तांत्रिक अडचणीवर तोडगा काढणे, यासह राज्य सरकारशी समन्वय साधून हे विषय तातडीने मार्गी लावायचे आहेत, यावर मला खूप काम करायचे आहे.
प्रश्न: केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पुण्याला जाण्यापूर्वी तुम्ही अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीत काय चर्चा झाली?
मुरलीधर मोहोळ: सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामध्ये पुण्याचा प्रश्नांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. 'पुणे विमानतळावरील नवे टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली, यासाठी आवश्यक असलेल्या आणि गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील सीआयएसएफच्या मनुष्यबळाची पूर्तता लवकरच करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. तसेच पुणे विमानतळावरील अपघातग्रस्त विमान 'रन वे'वरून हटविणे आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पुणे महापालिकेला मिळवून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावर सविस्तर चर्चेनंतर अमित शाह यांनी तातडीने या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे नवे टर्मिनल सुरू करण्याला गती प्राप्त झाली आहे. हे टर्मिनल लवकर सुरू करून पुणेकर प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. पुणे शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून येणारा निधी गेली काही काळ प्रलंबित होता. अमित शहा यांच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापानातून मिळालेल्या या निधीतून शहरभर विविध कामे केली जाणार आहेत. शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन व पूर नियंत्रणासाठी हा निधी तत्काळ मिळावा, अशी मुद्दा बैठकीत मांडला असता त्यावरही शहा यांनी सकारात्मकता दर्शवली आणि तातडीने निधी वर्ग केला जाईल, असे सांगितले.
प्रश्न: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यासाठी काय व्हिजन असेल?
मुरलीधर मोहोळ: मला मिळालेले मंत्रिपद हा प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे. पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर हा सन्मान मला मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेतच. स्थानिक स्वराज संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार तिघांची एकत्र मोट बांधून काम करावे लागणार आहे. शहरात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करायचे आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीएल आणि मेट्रो यांच्यासोबत एकत्रित काम करण्याचा प्लॅन आहे. खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट असे दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड पुण्यात आहेत, तिथल्या नागरिकांना विविध सुविधांच्या संदर्भात येत असलेल्या अडचणी पाहता तिथे काम करायचे आहे. देश पातळीवरील हा धोरणात्मक विषय आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात फेम दोनच्या अंतर्गत साडेतीनशे ई बसेस मिळाल्या, ही बसेसची संख्या वाढवायची आहे. पुणे- मुंबई रेल्वेमध्ये काम करायचे आहे. गाड्यांची संख्या वाढवता येईल का, पुण्याला आणखी  काही शहरांशी जोडता येईल का, यावर काम करणार आहे. थोडक्यात, पुण्याचा सर्वस्पर्शी विकास करायचा आहे.
प्रश्न: येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची तयारी कशी असेल? कारण पश्चिम महाराष्ट्रात तुमचे दोनच खासदार आहेत?
मुरलीधर मोहोळ: लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रभारी म्हणून आधीपासूनच मी संघटनेत काम करतोय. 58 विधानसभांची संघटनेची जबाबदारी माझ्यावर आहे. आता संघटनात्मक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या अशा दोन्ही पातळीवर पुढच्या काळात काम करणार आहे. यासाठी प्रवास करावा लागेल, पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडणे, स्थानिक पातळीवर काम करणे या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत.
प्रश्न: ज्या पुणेकरांनी तुम्हाला निवडून दिलं, यापूर्वीही चारवेळा महापालिकेत निवडून पाठवले त्यांच्या प्रति तुमच्या काय भावना आहेत?
मुरलीधर मोहोळ:  30 वर्षांचा माझा राजकीय प्रवास पुणेकरांमुळेच आहे. आज मला मोठी जबाबदारी मिळाली आहे. लोकसभेचा मोठा विजय पुणेकरांनी मिळवून दिला. माझा पक्ष सोबत आहे, पक्ष नेतृत्व सोबत आहे. मात्र प्रत्यक्ष निवडून देण्याचे काम पुणेकर जनतेने केले. त्यामुळे पुणेकरांबद्दल माझ्या मनात कायम प्रेम आहे, आदर आहे, झोकून देऊन मी कायम पुणेकरांची सेवा करणार हा शब्द पुणेकरांना देतो…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news