रमजान ईदनिमित्त शहरात उत्साह; खरेदीला सुरुवात

बाजारपेठांमध्ये गर्दी, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल
Pune News
रमजान ईदनिमित्त शहरात उत्साह; खरेदीला सुरुवात Pudhari
Published on
Updated on

पुणे: एकीकडे बिर्याणीपासून ते शाही तुकड्यापर्यंतच्या वैविध्यपूर्ण पदार्थांची रेलचेल, तर दुसरीकडे शिरकुर्म्यासाठी लागणार्‍या शेवया, विविध प्रकारचे खजूर, सुकामेव्याची खरेदी... महिला - युवतींकडून होणारी कपडे, बांगड्या, मेंदीची खरेदी अन् सगळीकडे दरवळलेला अत्तरांचा सुगंध... असे उत्साहपूर्ण वातावरण रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

रमजान ईद सोमवारी (दि. 31) असल्याने यानिमित्ताने कपड्यांपासून ते अत्तरांच्या खरेदीला सुरुवात झाली असून, कॅम्प, कोंढवा, वानवडी आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठेत सायंकाळी मुस्लिम बांधवांची गर्दी होत असून, खरेदीची धामधूम दिसून येत आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्ताने सगळीकडे आनंद बहरला आहेच... खासकरून वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळत आहे. बिर्याणी, कटलेट, समोसा, कबाब, लखनवी पुलाव अशा विविध खाद्यपदार्थांना पसंती मिळत असून, सरबत, फ्रुट प्लेट, गुलाबजाम, बर्फी यालाही पसंती मिळत आहे. मोमीणपुरा, कौसरबाग आणि कॅम्प परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांची रेलचेल आहेच, त्याशिवाय रमजान ईदच्या खरेदीसाठीची लगबगही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

मिठाई, शिरकुर्मासाठी लागणार्‍या शेवया, सुकामेवा, फळे, 120 हून अधिक प्रकारचे खजूर याची खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महिला-युवती कपडे, मेहंदी, दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. विविध प्रकारच्या अत्तरांचीही खरेदी करण्यात येत आहे. बाजारपेठांमध्ये यानिमित्ताने दुकानांना आकर्षक रोषणाई केली आहे, त्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य आले आहे.

याविषयी शोएब शेख म्हणाले, शिरकुर्मासाठी लागणार्‍या शेवयांनाही मोठी मागणी आहे. हैद्राबादी, अहमदाबादी प्रकारच्या शेवयांना मागणी आहे. रमजान ईदच्या दिवशी शिरकुर्मा मोठ्या प्रमाणात बनवला जातो. त्यामुळे शेवयांची मागणी वाढली आहे.

सगळीकडे दरवळतोय अत्तरांचा सुगंध

फिरदौस, गुलाब अन् बरंच काही... अशा विविध प्रकारच्या अत्तरांचा सुगंध सध्या बाजारपेठांमध्ये दरवळत आहे. रमजान महिन्याच्या निमित्ताने अत्तर खरेदीही मोठ्या प्रमाणात होत असून, फुलांच्या फ्लेवर्सपासून ते पारंपरिक प्रकारातील अत्तरांना पसंती मिळत असल्याची माहिती अत्तर विक्रेते आरिफ शेख सुरमेवाला यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news