तानाजी सावंताच्या मुलाचे अपहरणनाट्य; चौकशीअंती मित्रासोबत बँकॉककडे निघाल्याचे समोर

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
pune news
अपहरणनाट्य(file photo)
Published on
Updated on

पुणे : शिंदे गटाचे मराठवाड्यातील आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सोमवारी (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास पुण्यातून बेपत्ता झाला. त्याचा फोन बंद होता, तर गाडी देखील घरीच होती. सर्व ठिकाणी चौकशी केली. परंतु, त्याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी सावंत यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत ऋषिराजचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. मात्र, चौकशीदरम्यान तो आपल्या इतर दोन मित्रांसोबत खासगी विमानाने बँकॉककडे निघाला असल्याचे समजले. त्यानेच आरटीजीएसद्वारे पैसे देऊन हे विमान बुक केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांच्या मदतीने हे खासगी विमान अखेर रात्री सव्वानऊच्या सुमारास परत पुणे विमानतळावर उतरविण्यात आले. मुलाच्या या कथित अपहरणनाट्यामुळे खळबळ तर उडालीच. मात्र, राज्यासह देशपातळीवरील शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली.

ऋषिराज आणि त्याच्या दोन मित्रांना गुन्हे शाखेने विमानतळावरून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत होती. ऋषिराज नेमका बँकॉककडे का निघाला होता? हे मात्र समजू शकले नाही. ऋषिराज सावंत (वय 32, रा. मोरेबागेजवळ, कात्रज) हा तानाजी सावंत यांचा धाकटा मुलगा आहे. तो जेएसपीएम या संस्थेचा ट्रस्टी देखील आहे. ऋषिराजचे अपहरण झाल्याचा संशय आल्यानंतर राहुल सुभाष करळे (वय 47, रा. सावंतविहार, मोरेबागेजवळ, कात्रज) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादी करळे हे नर्‍हेतील जेएसपीएम कॉलेजच्या सिव्हिल विभागाचे प्रमुख आहेत. दि. 10 फेब—ुवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास करळे कॉलेजमध्ये आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे कामकाज सुरू केले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना संचालक शशिकांत थिटे यांचा फोन आला. त्यांनी फोनवर संस्थेचे ट्रस्टी ऋषिराज यांचा फोन बंद लागत असल्याचे सांगितले. त्यांनी ते कॉलेज परिसरात आहेत का? याची खात्री केली. मात्र, त्यांच्या ठावठिकाणाबद्दल माहिती मिळाली नाही. त्यानंतर तानाजी सावंत यांनीही माहिती घेतली. परंतु, त्यांनाही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे ऋषिराजचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय बळावल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर सर्वत्र माहिती पसरल्यानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.

...असा आला बँकॉकचा प्रकार उजेडात

ऋषिराजने पुणे विमानतळावर जाण्यासाठी स्वतःची गाडी वापरली नाही. त्याने संस्थेतील गाडीने चालकाला आपल्याला विमानतळावर सोडण्यास सांगितले. त्याच्यासोबत दोन मित्र होते. तो बेपत्ता झाल्यामुळे तानाजी सावंत यांच्यापासून सर्वजण त्याचा शोध घेत होते. तो काही मिळून येत नव्हता. त्यामुळे सावंत यांनी पोलिसात धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. तोपर्यंत संस्थेतील एका गाडीने त्याला विमानतळावर सोडल्याचे सांगितले. वरिष्ठ पातळीवर यंत्रणा कामाला लावून सावंत यांनी माहिती घेतली. त्या वेळी ऋषिराज आणि त्याचे दोन मित्र बँकॉककडे निघाल्याचे समजले. सावंत यांनी थेट पुणे पोलिस आयुक्तालय गाठले. तेथे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे यांना ही माहिती दिली. त्यांनी तपासाची सूत्रे गतिमान करत एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क करून ऋषिराजचे खासगी विमान बँकॉकच्या हद्दीत जाण्यापूर्वीच रोखून रात्री सव्वानऊच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरविले.

पुणे नियंत्रण कक्षाला कॉल आला होता. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. माहिती घेतली असता, तो खासगी विमानाने बँकॉककडे निघाल्याचे समजले. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून रात्री उशिरा हे विमान पुणे विमानतळावर उतरविले आहे. ऋषिराज आणि त्याचे दोन मित्र सुखरूप आहेत. नेमके कोणत्या कारणातून हे तिघे चालले होते, याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

रंजनकुमार शर्मा, सह पोलिस आयुक्त, पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news