

Water shortage Pune
पुणे: पुणे शहरात पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे. अनेक भागांत अघोषित पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाणी पुरेशा प्रमाणात पुरवण्याची ओरड नागरिकांकडून केली जाते. सत्ताधारी देखील पुण्याला पाणी मिळावे म्हणून ग्रामीण भागातील धरणांतील पाण्याची मागणी करीत आहेत.
पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता पाणीपुरवठा करण्याचे पालिकेपुढे आव्हान असून, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार केले जाते. मात्र, पुण्यातील अनेक सोसायट्यांनी याकडे दुर्लक्ष करीत पाण्याची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी वापरणे अपेक्षित असताना पुण्यातील 15,500 सोसायट्यांमध्ये प्रतिव्यक्ती 200 ते 1500 लिटर पाण्याचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी देखील वाढली आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणसाठ्यात 15 जुलैपर्यंत शहराला पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, पाणीटंचाई जाणवू लागल्याने मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचे नियोजन सध्या पालिकेमार्फत केले जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने शहरातील विविध सोसायट्यांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप हे पत्र सोसायट्यांना देण्यात आलेले नाही. पाणीपुरवठा विभागाकडून समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पुण्यात एक लाख 65 हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. यातील सुमारे 15,500 सोसायट्यांमध्ये पाण्याची उधळपट्टी केली जात असल्याचे पालिकेच्या पाहणीत समोर आले आहे.
यात प्रामुख्याने सोसायट्यांचे नळ कनेक्शन, पाण्याच्या टाक्यांमधील गळती, फ्लश टँक लिक असणे यांसारख्या अनेक कारणांमुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यासोबतच प्रतिव्यक्ती 135 लिटर पाणी वापरणे अपेक्षित असताना तब्बल 1500 लिटर पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे या पाण्याच्या होणार्या उधळपट्टीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कंबर कसली आहे. पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांकडून सोसायट्यांची तपासणी केली जाणार असून, याबाबतचे आदेश कनिष्ठ अभियंत्यांना दिले जाणार आहेत.
सोसायट्यांची होणार पाहणी
शहरात काही जुन्या सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या टाक्यांची वर्षानुवर्षे दुरुस्ती झालेली नसल्याने या टाक्यांना मोठी गळती असते. टाक्यांतून पाणी जमिनीत मुरते, तर टाकी भरल्यानंतर पाणी ओसंडून वाहते. अनेक सोसायट्यांमधील, फ्लॅटमधील नळ लिकेज असतात, त्यामुळे देखील पाणी वाया जाते. त्यामुळे आता सोसायट्यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, सोसायटीतील उद्यानासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे पत्र पालिका सोसाट्यांच्या अध्यक्षांना देणार आहेत.
शहराच्या पाण्याच्या मागणीत 15 टक्क्यांनी वाढ
पुण्यात उन्हाळ्यामुळे पाण्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीबचतीसाठी पालिका सोसायट्यांना पत्र लिहिणार आहे.
उन्हाळा असला तरी पालिकेकडून शहराला पुरेसा पाणीपुरवठा केला जात आहे. प्रतिव्यक्ती 153 लिटर पाणी वापरणे गरजेचे आहे, तर फ्लॅटमधील चार व्यक्तींकडून 540 लिटर पाण्याचा वापर होणे आपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याचे पाणी मीटरमुळे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारपणे पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही सोसायट्यांना आधी पत्र देणार असून, त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर त्यांना नोटीस पाठवून कारवाई केली जाणार आहे.
- नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका