पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदानावर पावसाचे सावट असल्याने वडगाव शेरी, खराडी, येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरात मतदान केंद्रावर पहिल्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. वडगाव शेरीतील सारथी विद्यालयासह अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या मतदारांची नावे नसल्याने गोंधळ उडाला. टिंगरेनगर भागातील मतदान केंद्रांतील ईव्हीएम यंत्र काही काळ बंद पडले होते.
वडगाव शेरी मतदारसंघामध्ये सकाळी नऊपर्यंत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर काही प्रमाणात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे जाणवले. दुपारी तीनपर्यंत केवळ 29.27 टक्केच मतदान झाले होते. तर त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागल्याचे दिसून आले. सायंकाळी 5 पर्यंत 40.5 टक्के झाले असल्याचे आढळून आले आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी भागातील मतदान केंद्रांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
येरवडा येथील यशवंतराव चव्हाण विद्या निकेतन येथे अलका मोरे या मतदाराचे नावच गायब झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना मोरे म्हणाले, आत्तापर्यंत प्रत्येक मतदान केले आहे. माझ्या सासुबाईंचे निधन झालेले असताना त्यांचे नाव आहे. मात्र, माझेच नाव गायब झाल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
हेही वाचा