

पुणे: मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार याची तत्कालीन सरकारसह सगळ्यांना कल्पना होती. पण, वेळीच पाऊले उचलली गेली नाहीत. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याबाबत तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी रविवारी (दि.20) केला.
स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. यासह आज हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचेही ते म्हणाले.
रविवारी (दि.20) प्रभात रस्ता येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात भांडारी बोलत होते. लेखक विक्रम भावे, हिंदू विधिज्ञ परिषदेचे संजीव पुनाळेकर, सनातन संस्थेचे अभय वर्तक या वेळी उपस्थित होते.
भांडारी म्हणाले, ‘2002 च्या दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. तेव्हापासून एका साखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटनांना मोडून काढण्याचे षड्यंत्र सुरू आहे. ही मोहीम खोल रुतलेली आहे. देशात राजकीय बदल झाला, तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्याय व्यवस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.
महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा चेहरा देण्यात आला आहे. हे दूर झाल्याशिवाय आणि राज्यातील जातीय राजकारण नष्ट झाल्यानंतरच हिंदुत्व येऊ शकते, असे पुनाळेकर यांनी सांगितले. आपल्या देशात धर्मस्वातंत्र्य असतानाही हिंदू समाज पुरोगामी विचारांना बळी पडला आहे. हिंदू दहशतवाद नाव देऊन विक्रम भावे यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, असे वर्तक यांनी म्हणाले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात कोणताही हात नसताना मात्र मला अटक झाली. केवळ हिंदुत्ववादी असल्याने हे मला भोगावे लागले. हिंदूविरोधी षड्यंत्राला सामोरे जाण्यासाठी हिंदूंना कष्ट घ्यावे लागतील, एकत्र यावे लागले.
- विक्रम भावे, लेखक