

पुणे: पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीर पर्यटनाचा नियोजित बेत कॅन्सल करतील, त्याचा विपरीत परिणाम स्थानिक काश्मिरींच्या वर्षभरातील बेगमीवर होणार, अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू असल्याचे दिसून येते. तशी भीतीही अनेक काश्मिरी नागरिक समाजमाध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत.
मात्र, जम्मू काश्मीरला आम्हाला जाता येईल का, तेथील पर्यटनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली का, अशी विचारणा करणारे अनेक फोन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला पर्यटकांकडून केले जात आहेत. त्यामुळे काही झाले तरी पर्यटकांना पर्यटनाची ओढ शांत बसू देत नाही, याची प्रचिती आता येत आहे.
पहलगाम घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला. हा कक्ष जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेत आहे आणि त्यांना परत येण्यासाठी मदत करत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 657 पर्यटकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. यापैकी 546 पर्यटक विमान, रेल्वे आणि खासगी वाहनांनी 29 मेपर्यंत जिल्ह्यात परत येणार आहेत.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यातील अनेक पर्यटक आपली ट्रिप मध्येच सोडून माघारी आले आहेत. तर अनेक पर्यटकांनी मे महिन्यातील सट्ट्यांचा योग साधून जम्मू-काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. त्यांनी आगाऊ बुकिंग करून ठेवले आहेत. हे पर्यटक आता संभ्रमाच्या स्थितीत आहेत, बुकिंग रद्द करावी की प्रवासाला जावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
या संदर्भात त्यांना अधिकृत आणि खात्रीशीर माहिती मिळत नसल्यामुळे ते अधिक चिंतेत आहेत. त्यामुळे, हे पर्यटक आता जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे विचारणा करत आहेत. ‘आम्ही जम्मू-काश्मीरला जाऊ शकतो का? तेथील परिस्थिती कशी आहे? विमान सेवा पूर्ववत झाली आहे का? पर्यटनाची ठिकाणे सुरू आहेत का?’ अशा प्रकारचे प्रश्न ते विचारत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
भयभीत पर्यटकांना जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाचा दिलासा
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेले पर्यटक मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने त्वरित जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम हे या घडामोडींवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत. तसेच, नियंत्रण कक्षाला संपर्क साधणार्या पर्यटकांना धीर देण्याचे महत्त्वाचे काम नियंत्रण कक्षातील राहुल पोखरकर, मझहर झारी, विश्वास जाधव, विवेक कांबळे, अमर काळे, प्रदीप गवई, गौरी बाबर आणि सायली चव्हाण हे करत होते.