

खडकवासला/पुणे : पुणे शहर व परिसराला जवळपास एक महिना पुरेल इतके पाणी दोन दिवसांमध्ये खडकवासला धरणसाखळीत जमा झाले आहे. मंगळवारी (दि. 17) दिवसअखेर धरणसाखळीत 6 .49 टीएमसी म्हणजे 22.26 टक्के साठा झाला होता. रविवारी (दि. 15) सायंकाळी पाच वाजता
धरणसाखळीत केवळ 5.20 टीएमसी पाणी होते. धरणक्षेत्रात संततधार पावसामुळे दोन दिवसांच्या 48 तासांत 1.29 टीएमसी पाण्याची वाढ झाली.
मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे; मात्र पानशेत, वरसगाव धरण खोर्यात अधूनमधून जोरदार वार्यासह सरी कोसळत आहेत. दिवसभरात टेमघर येथे 20, वरसगाव येथे 15 आणि पानशेत येथे 12 मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला परिसरात पावसाची उघडीप होती.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत, वरसगाव धरण क्षेत्रासह मुठा, सिंहगड भागात लागोपाठ दोन दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे ओढे-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू आहे. मंगळवारी पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी धरणसाठ्यातील वाढ मंदावली आहे.
खडकवासला धरण माथ्यावर पावसाने उघडीप दिली असली, तरी धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 58 टक्क्यांहून अधिक झाली आहे. धरणसाखळीतील सर्वांत मोठ्या वरसगावची पाणी पातळी 25.81 टक्क्यावर पोहचली आहे. पानशेतमध्ये 17.25 व टेमघरमध्ये 4.89 टक्के साठा झाला आहे. तरी देखील गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 17 जून 2024 रोजी धरणसाखळीत 3.73 टीएमसी पाणी होते.