'ससूनमधील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत'

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती
Sassoon hospital
'ससूनमधील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया आठ दिवसांत'File Photo
Published on
Updated on

पुणे: ससून रुग्णालयास 2350 पदे मंजूर असून, त्यातील 789 पदे रिक्त आहेत. परिचारकांची 160 पदे रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीची 50 टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसांत सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत पाढाच वाचला. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांत वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत याप्रकरणी आठ दिवसांत भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.

ससूनमधील पदभरती टीसीएसद्वारे जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने केली जाते. येत्या आठ दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील. तसेच वर्ग-1 ची 44 आणि वर्ग-2 ची 110 रिक्त पदे तत्काळ भरली जातील, अशी माहिती मिसाळ यांनी दिली.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे; जेथे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येतात. वर्षाला साडेपाच लाख रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात.

पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे अ‍ॅडमिट असतात. येथे 155 खाटांचा आयसीयू आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकचा भार पडत आहे.

पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली.

12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी

ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच 12 कोटी 94 लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच, उपकरणांची देखील खरेदी करण्यात आली, तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व परिसरातील हजारो रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. मात्र, या रुग्णालयातील आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया साधनसामग्री आणि औषधांचा तुटवडा वारंवार जाणवत आहे. अत्यावश्यक सेवा, विशेषतः आपत्कालीन विभाग व सर्जरी विभाग, योग्यप्रकारे कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापन अत्यंत असमाधानकारक आहे. वॉर्ड व ओपीडी विभागात स्वच्छतेचा अभाव असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

- सुनील कांबळे, आमदार

ससून रुग्णालयात एमआरआय तपासणी मशिन बंद आहे. तपासणी करण्यासाठी दोन-दोन दिवस ताटकळत थांबावे लागते. ससूनमध्ये एमआरआय मशिन उपलब्ध करीन द्यावे तसेच कायमस्वरूपी हृदयरोगतज्ज्ञ नियुक्त करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालयासाठी व्हीलचेअर तातडीने खरेदी कराव्यात.

- सिध्दार्थ शिरोळे, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news