

Elysian lounge inauguration Pune
पुणे : विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एलिजियन इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह लाउंज या अत्याधुनिक लाउंज सुविधेचे उदघाटन करण्यात आले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुरुवारी (५ जून) या लाउंजचे लोकार्पण झाले. ही सुविधा पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीमधील आंतरराष्ट्रीय सुरक्षा होल्ड एरियामध्ये आहे.
या लाउंजमुळे पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता परवडणाऱ्या दरात पंचतारांकित सोयीसुविधांचा अनुभव घेता येणार आहे. एलिजियन इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह लाउंज हे आधुनिक डिझाइन आणि कार्यक्षमतेचा उत्तम मिलाफ आहे.
येथे प्रवाशांना आरामदायक बैठक व्यवस्था, विविध प्रकारचे रुचकर भोजन आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी खास सेवा उपलब्ध आहेत. विमान प्रवासापूर्वी आराम करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी हे शांत आणि आकर्षक वातावरण अतिशय योग्य आहे.
नवीन टर्मिनल इमारत जुलै २०२४ पासून कार्यान्वित आहे. यात १० एअरोब्रिज, ३४ चेक-इन काउंटर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. या इमारतीला प्रतिष्ठित फोर-स्टार ग्रिहा-रेटिंगही मिळाले आहे. आता या 'एलिजियन इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह लाउंज'च्या जोडीने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुणे विमानतळ अधिक कटिबद्ध झाले आहे. हे नवे लाउंज पुणे शहराची एक गतिशील आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेली प्रतिमा अधिक उंचावेल.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ