El Niño Ending in June | ‘अल-निनो’ला जूनमध्‍ये अलविदा! पुढील मान्‍सून जोरदार

‘ला-निना’च्या थंड वाऱ्यांमुळे भारतीय उपखंडात ९८ ते १०० टक्‍के पावसाचा अंदाज
El Niño Ending in June |
El Niño Ending in June | ‘अल-निनो’ला जूनमध्‍ये अलविदा! पुढील मान्‍सून जोरदार
Published on: 
Updated on: 

आशिष देशमुख

पुणे : बळीराजाच्‍या आयुष्‍याचे वैराण वाळवंट करणार्‍या यंदाच्‍या भयंकर दुष्‍काळावर उतारा ठरू शकणारी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. ज्‍या ‘अल-निनो’ने महाराष्‍ट्र आणि भारतीय अर्थव्‍यवस्‍थेची वाट लावली तो ‘अल-निनो’ पुढील जूनमध्‍ये अलविदा करणार आहे. याच जूनमध्‍ये ‘ला-निना’ही स्‍थिती विकसित होत असल्‍याने २०२७ चा मान्‍सून जोमाने बरसणार आहे. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रशांत महासागरातील ‘अल-निनो’ची स्थिती पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून कमकुवत होण्याचे संकेत असून, जून २०२७ च्या पावसाळ्यात ‘ला-निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनाच्या (एनओएए) नोव्हेंबर २०२६ मधील ताज्या अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट २०२७ या कालावधीत ‘ला- निना’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढील वर्षी भारतीय मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचे सकारात्मक संकेत आहेत.

‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ ही अमेरिकेची सरकारी वैज्ञानिक संस्था असून, महासागर, वातावरण, हवामान बदल, चक्रीवादळे आणि हवामानाचा दीर्घकालीन अंदाज यावर संशोधन करते. या संस्थेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरकडून ‘अल-निनो’ आणि ‘ला-निना’ याविषयी नियमित अंदाज प्रसिद्ध केले जातात. या संस्थेच्या नोव्हेंबरमधील अंदाजानुसार, सध्या ‘अल-निनो’ची स्थिती मजबूत होत असून, जानेवारी ते मार्च २०२७ पर्यंत ती कायम राहण्याची शक्यता ७९ टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर ‘अल-निनो’चा प्रभाव कमी होऊन प्रशांत महासागरात तटस्थ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मे-जुलैमध्ये ‘ला-निना’ची शक्यता १३ टक्के, तर जून-ऑगस्टमध्ये ३३ टक्के होणार असल्याचे अंदाजात नमूद केले आहे.

‘अल-निनो’मुळे भारतीय उपखंडातील मान्सूनच्या पावसावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. याउलट, ‘ला-निना’ स्थिती अनेकदा भारतीय मान्सूनला अनुकूल ठरते. त्यामुळे २०२७ मध्ये महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरातील स्थिती, मान्सूनचे वारे, हिंदी महासागर द्विध्रुव (आयओडी) आणि इतर वातावरणीय घटकांचाही पावसावर परिणाम होतो. त्यामुळे पुढील वर्षीच्या मान्सूनचे अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी आगामी हवामान अंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत.

‘अल निनो’ हद्दपार होणार हा अंदाज बरोबर आहे, असे मला वाटते. कारण, याआधी २०१२ मध्ये ‘अल-निनो’ची स्थिती होती. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये धो धो पाऊस आला होता. तीच परिस्थिती २०१५, त्यानंतर २०१८ आणि २०२४ या वर्षांतदेखील होती. ‘अल-निनो’ सक्रिय होता. ज्या-ज्या वर्षी ‘अल-निनो’ सक्रिय होता, त्याच्या पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडला आहे. २०२४ मध्ये ‘अल-निनो’ असाच तीव्र होता. त्यानंतरचा म्हणजे २०२५ चा मान्सून खूप वेगाने आला होता, तो मे महिन्यातच दाखल झाला होता. त्यामुळे यंदाचा मान्सूनदेखील खूप चांगला होईल, अशी शक्यता आहे.

डॉ. रामचंद्र साबळे, ज्‍येष्‍ठ कृषी शास्‍त्रज्ञ­

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.