Monsoon Update | फेब्रुवारी २०२७ पर्यंत जाणवणार अल निनोचा प्रभाव; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज

मराठवाडा-विदर्भात पावसाची तूट, उन्हाळाही खूप तीव्रतेचा राहणार
ain
पावसाचा अंदाजPudhari News Network
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे : यंदाचा पावसाळ्यावर अल निनोचा जबरदस्त प्रभाव राहिला असून, सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. अल निनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार असल्याने यंदाचा उन्हाळा खूप तीव्रतेचा असेल. असा अंदाज पुणे आयएमडीचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. त्यांनी एकूणच अल निनोबाबत व्यक्त केलेली अभ्यासपूर्ण निरीक्षणे त्यांच्याच शब्दांत...

यंदाच्या मान्सूनबाबत खूप आधी म्हणजे अगदी २०२५ च्या ऑक्टोबरपासून अल निनो बाबतचे अंदाज जागतिक हवामान संघटनेसह जगातील बऱ्याच शास्त्रज्ञांनी देण्यास सुरुवात केली होती. तशाच प्रकारचे अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानेही दिले होते. जून आणि ऑगस्ट जवळपास कोरडाच गेला. मराठवाडा आणि विदर्भात त्यामुळे मोठी तूट दिसून येत आहे. देशात सरासरीच्या ८५ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १५ टक्के तूट आहे. तर राज्यात १६ टक्के तूट आहे.

२० जिल्ह्यांत कमी पाऊस

यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात तब्बल २० जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे मोठ्या संख्येने आहेत. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही भागात जून आणि ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही. फक्त जुलै महिन्यात काही दिवसच पाऊस झाला. सप्टेंबरमध्येही फार मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे हंगामाअखेर मोठी तूट वाढणार आहे.

यंदाचा उन्हाळा खूप कडक

अल-निनोचा प्रभाव जसा २०२६ च्या मान्सूनवर दिसला तसा तो २०२७ मधील उन्हाळ्यावर दिसणार आहे. कारण अल निनोचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार आहे. यंदा ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच तापमान वाढीस सुरुवात होईल. सरासरी कमाल तापमानात मोठी वाढ दिसून येईल. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी नियोजन हे आपल्या समोर आव्हान राहणार आहे.

पुढच्या वर्षीचा पावसाळा कसा राहील?

अल निनोचा प्रभाव ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून अधिकच तीव्र होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहील. मात्र, २०२७ चा पावसाळा कसा राहील हे सांगणे कठीण आहे. कारण तोवर अल निनोचा प्रभाव कसा आहे, याचे भाकित करणे योग्य ठरणार नाही.

पाण्याचे नियोजन आवश्यक

यापूर्वी अनेक दुष्काळ पाहिले. त्यामुळे यंदासुद्धा आपण शासकीय पातळीवर जे पाण्याचे नियोजन करू ते चांगलेच असेल. जुलैच्या पावसाने राज्यातील धरणांत सध्या पुरेसे पाणी आहे. त्याचे नियोजन गरजेचे आहे.

सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस कसा राहील?

यंदा जुलैमध्येच चांगला पाऊस झाला. मात्र, जून, ऑगस्ट कोरडा गेला. तर सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज आहे. आगामी चार ते पाच दिवस चांगला पाऊस आहे. कारण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हा पाऊस राहील, पण पुढच्या पंधरा दिवसांत जेव्हा मान्सून परतीला निघेल, तेव्हा मात्र फार मोठा पाऊस दिसत नाही. कारण तशी प्रणाली सक्रिय होताना दिसून येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news