

मान्सून पुण्यात दाखल, ४८ तासांत मुंबईत येणार
- हवामान विभागाची घोषणा ः आठ दिवस राज्यात मुसळधारेचा इशारा
पुणे ः पुढारी वृत्तसेवा
अल-निनोचे अडथळे पार करत अखेर सोमवारी (२२ जून) सकाळी मान्सून पुणे शहरात दाखल झाला. यंदा तो नियोजित तारखेपेक्षा तब्बल १५ दिवस उशिरा आला. मान्सूनचा वेग पाहता आगामी ४८ तासांत तो मुंबईत पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील आठ दिवस मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले पंधरा दिवस मान्सून बारामती, हरणाई, सोलापूर भागात थबकलेला होता. मात्र, रविवारी (दि. २१) तो हवेचे दाब अनुकूल होताच सक्रिय झाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. सोमवारी सकाळीच मान्सून पुण्यात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली. तसेच, मुंबईत आगामी ४८ तासांत तो धडकणार असल्याचा अंदाज दिला. त्यामुळे आता राज्यात तो जोरदार मुसंडी मारणार आहे. मात्र, जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै उजाडणार आहे.
--------------
...अशी आहे स्थिती
- मान्सूनची रेषा पुणे, अलिबाग, तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड, निजामाबाद, दंतेवाडा, बालंगीर, सुंदरगड, चतरा, गया, मुझफ्फर, बिहार, ओडिशा या भागातून जात आहे.
- आगामी ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापणार आहे.
-------------
... का थबकला आणि कसा पुढे निघाला?
- अरबी समुद्रातील वारे कमकुवत होते, त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव क्षीण होता. तसेच, हवेचे दाब अनुकूल नव्हते.
- आता ते वारे बळकट झाले. हवेचे दाब अनुकूल झाल्याने मान्सून वारे सक्रिय झाले, ताशी वेग ५० ते ६० कि.मी.
- अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला. त्यामुळे कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात ढग आणि पावसाची सक्रियता वाढली.
- पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार सक्रिय
- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रगतीची चिन्हे
- जूनमधील तूट भरून निघणे कठीण त्यासाठी जुलै उजाडावा लागणार
--------------
... असे आहेत अलर्ट (कंसात तारखा २३ ते २६ जून)
- ऑरेंज अलर्ट ः चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा (दि.२३, २४ जून)
- यलो अलर्ट ः पुणे घाट, पुणे शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भंडारा (२३ ते २६), पालघर, मुंबई, ठाणे (२३, २४), कोल्हापूर घाट (२३, २४, २५), कोल्हापूर शहर (२३, २४), सातारा घाट (२३, २४), सांगली (२३), सोलापूर (२४), छत्रपती संभाजीनगर, जालना (२३, २४), बीड (२४), बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ (२५, २६).
--------------------
( नकाशा ओळ ः सोलापूर, हरणाई, बारामती भागात गत १५ दिवसांपासून अडखळलेला मान्सून रविवारी सक्रिय झाला आणि सोमवारी सकाळी पुणे शहरात आला. निळ्या रेषांत हा प्रवास दिसत आहे.