7-8 Month Summer | ‘अल निनो’ अन्‌ दुष्काळामुळे उन्हाळा यंदा ७-८ महिन्यांचा!

ऑक्टोबर ते मेदरम्यान तापमानाचा आलेख वाढणार
7-8 Month Summer |
7-8 Month Summer | ‘अल निनो’ अन्‌ दुष्काळामुळे उन्हाळा यंदा ७-८ महिन्यांचा!
Published on: 
Updated on: 

आशिष देशमुख

पुणे : यंदा सप्टेंबरअखेरीस महाराष्ट्राचे कमाल तापमान ३५ तर राजस्थानचे ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याची नोंद झाली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, कमी पाऊस आणि जमिनीतील ओलावा घटल्यामुळे यंदा थंडीही कमीच जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते मे असा सलग ७ ते ८ महिन्यांचा प्रदीर्घ उन्हाळा सोसावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा महाराष्ट्रात निर्माण झालेली गंभीर दुष्काळी स्थिती व ‘अल निनो’च्या वाढत्या प्रभावामुळे कमाल तापमानात विक्रमी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ‘आयएमडी’च्या प्रादेशिक तापमानवाढ तपशिलानुसार, कोकण किनारपट्टी व मुंबई परिसरात आर्द्रतेसह कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढले आहे. उर्वरित भागात तो फरक ५ ते ७ अंशांनी वाढला आहे. जळगाव व सोलापूरसारख्या शहरात आताच उन्हाळ्यासारखे वातावरण आहे. तेथे पारा ३५ अंशांवर जाण्याच्या स्थितीत आहे.

परतीचा मान्सून अजून महाराष्ट्रात आलेला नाही. मात्र, त्याच्यात जोर कमी असल्याने तो कमी बरसून लवकर निरोप घेण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर हीट नेहमीपेक्षा अधिक तीव्र असेल. यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची ७० ते ८० टक्के मोठी तूट आहे.

शास्त्रज्ञांचे निष्कर्ष

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल आणि सहकाऱ्यांच्या शोधनिबंधानुसार, जागतिक तापमानवाढ आणि प्रशांत महासागरातील तीव्र ‘अल निनो’ स्थितीचा भारतीय मान्सूनवर गंभीर परिणाम झाला आहे.

महासागरांचे तापमान वाढल्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे कमी तयार झाले. परिणामी, मध्य आणि उत्तर भारतात पावसाचे मोठे खंड पडले.

जमिनीतील आर्द्रता नष्ट झाल्यामुळे ‘लँड-अ‍ॅटमॉस्फीअर फीडबॅक’मुळे हिवाळ्यातही रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि मार्चपूर्वीच तीव्र उष्णतेच्या लाटा सुरू होतील.

विदर्भ, मराठवाड्याचा पारा ३५ अंशांवर

कोरड्या हवामानामुळे विदर्भ-मराठवाड्यातील कमाल तापमान सप्टेंबरमध्येच ३५ अंशांच्या वर गेले आहे. उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांत, विशेषतः राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त नोंदवले गेले. राजस्थानातील जैसरमेल येथे २६ सप्टेंबर २०२६ रोजी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यावरून ऑक्टोबरमध्ये काय स्थिती राहील, याचा अंदाज येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news