वारजे/कोथरूड: काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे आणि अनिकेत जावळकर यांच्या हस्ते रविवारी कर्वेनगर येथे ही मदत जगदाळे कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात आली.
संतोष जगदाळे यांच्या मातोश्री माणिकबाई, पत्नी प्रगती, मुलगी आसावरी आदींचे आ. शिवतारे यांनी सांत्वन केले आणि पहलगाम येथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. या वेळी विनोद जावळकर, माजी नगरसेवक राजेश बराटे, शिवराम मेंगडे, भुषण वरपे आदी या वेळी उपस्थित होते.
संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी आणि कुटुंबीयांनी पहलगाम येथील हल्ल्याचा थरारक घटनाक्रम आ. शिवतारे यांना सांगितला. आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी या वेळी कुटुंबीयानी केली.पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याप्रसंगी आसावरी ही इतर जखमींना मदत करत होती. माझ्या मुलीच्या धाडसाची सरकारने दखल घेऊन तिला शौर्यपदक जाहीर करावे, अशी इच्छा या वेळी आसावरीच्या आईने व्यक्त केली.