मंचर: गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम दुभती जनावरे, पोल्टीमधील कोंबड्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे पशुपालकांकडून गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांसाठी हवेशीर मांडव उभारले आहेत. तर पोल्ट्रीचालक देखील कोंबड्यांसाठी पोल्ट्रीतील वातावरण थंड राहण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत.
आंबेगाव तालुक्यात बागायती क्षेत्र मोठे असल्याने शेतकरी शेतीबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, पशुपालन मोठ्या प्रमाणात करतात. अनेक शेतकर्यांच्या घरी गाई, म्हशी, बैलांसाठी पत्र्याचे बंदिस्त गोठे बांधले आहेत. यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला.
बंदिस्त गोठ्यांमध्ये जनावरांना अधिक उकाडा होऊन त्याचा परिणाम दुधावर होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणार्या अनेक शेतकर्यांनी घराजवळ, शेताजवळ जनावरांसाठी मांडव बांधले आहेत. मांडवावर गवत, वैरण, याचे आच्छादन करून जनावरांसाठी गारवा निर्माण केला आहे.
तर अनेक पोल्ट्रीचालक पोल्ट्रीत फॅन, कूलर, पत्रा शेडवर स्प्रिंकलरद्वारे तुषार सिंचन करून वातावरण थंड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोल्ट्रीवरील पत्र्यावर पक्ष्यांना गरम होऊ नये म्हणून पाणी सोडले जात आहे. यामुळे कोंबड्यांना उष्णतेच्या त्रासापासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी
जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी, गडद छायेत उभे करावे. गोठ्यामध्ये थंड हवा खेळती करावी. त्यासाठी पंखा, कूलरची व्यवस्था करावी. जनावरांना पिण्यासाठी थंडगार व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. बर्फाचे खडे चघळावयास द्यावेत. त्याचप्रमाणे ते अंगावर, डोक्यावर फिरवावेत. पाठीच्या कण्यावरील बाजूस, अंगावर थंड पाणी ओतावे.
जनावर खुराक खात नसल्यास काही प्रमाणात गूळ चाटायला द्यावा. उष्माघात झाल्यास पशुवैद्यकाकडे त्वरित संपर्क करावा. दूध देणार्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो. दूध उत्पादनात वाढ होते.
- अजय कोल्हे, पशुधन अधिकारी, मंचर.