वाल्हे : मागील काही वर्षांपासून पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी फुलशेतीकडे देखील वळू लागले आहेत. खर्च, कष्ट कमी आणि शाश्वत उत्पन्न, असे फुलशेतीचे समीकरण लक्षात घेत वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील बहुतांश शेतकर्यांनी विविध फुलांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
वाल्हे परिसरातील शेतकरी, झेंडू, गुलछडी, मोगरा आदी फुलांची शेती करत असून त्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई करीत आहेत. वाल्हे येथील शेतकरी सागर भुजबळ, किसन पवार, संदीप राऊत, योगेश पवार यांनी देखील पारंपरिक पिकांना डावलून मोगरा या फूल पिकाची लागवड केली आहे.
एकदा लागवड केल्यानंतर तब्बल 10 वर्षे या पिकापासून उत्पादन मिळवता येते. तर वर्षभरातही टप्प्याटप्प्याने उत्पादन मिळते. सागर भुजबळ यांनी 10 गुंठे शेतात मोगर्याची लागवड केली. कमी पाण्यात अन् कमी कष्टात या पिकातून त्यांना चांगली कमाई होत आहे. या फुलशेतीसाठी दरवर्षी जमिनीची मशागत करावी लागत नाही. परिणामी खर्च वाचतो, मेहनत कमी करावी लागते, शिवाय मोगर्याच्या फुलाला बाजारात कायमच मागणी असते. लग्नसराईमध्ये ही मागणी दुप्पट होते. जरी हंगाम नसला तरी देखील या फुलाला मोठी मागणी बाजारात आहे. दरम्यान मोगरा फुलांची आता नुकतीच तोडणी सुरू झाली आहे. मात्र, वातावरणातील बदलाचा फटका फूल उत्पादकांना बसत आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन, रात्रीचा उकाडा, तर पहाटे थंडी. अशा वातावरणामुळे फुलांचे उत्पादन काहीसे घटले आहे. सध्या दिवसात दोन ते 3 किलो फुले मिळत आहेत. पुढील काही दिवसात थंडी कमी होऊन याच क्षेत्रातून दिवसाला 6 ते 7 किलो फुलांचे उत्पादन मिळेल. पुण्याच्या बाजारात मोगर्याला 450 ते 550 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.