राज्यातील ई-मोजणीचे काम आता 100 टक्के ऑनलाइन

1 डिसेंबरपासून जमिनीची मोजणी ऑनलाइन पद्धतीने
Pudhari
राज्यातील ई-मोजणीचे काम आता 100 टक्के ऑनलाइनPudhari
Published on
Updated on

सुनील कडूसकर

Pune: सध्या पारंपरिक साधनांद्वारे होणार्‍या जमिनीच्या मोजणीच्या कामासाठी आता जीपीएस यंत्रणेशी संलग्न यांत्रिक बग्गीचा (रोव्हर) वापर केला जाणार आहे. त्यामुळे जमिनीची अचूक मोजणी होणार असून, भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मुळशी, मावळ, हवेली, दौंड, शिरूर या सात तालुक्यांसह राज्यातील 13 तालुक्यांमध्ये येत्या 1 डिसेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने मोजणीचे काम सुरू होणार आहे.

भूमिअभिलेख विभागाने जमिनीच्या मोजणीसाठी ई-मोजणी व्हर्जन 2 लागू केल्याने अर्ज करण्यासाठी, शुल्क भरण्यासाठी वा मोजणीची ‘क’ प्रत घेण्यासाठी उपअधीक्षक भूमिअभिलेख (टीएलआर) कार्यालयात जाण्याची गरज आता उरणार नाही.

पुणे, सातारा, रत्नागिरी व नाशिक जिल्ह्यातील 13 तालुके वगळता अन्यत्र यापूर्वीच टप्प्याटप्प्याने ई-मोजणी व्हर्जन 2 लागू करण्यात आले होते. 1 डिसेंबरपासून शिल्लक असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण या तालुक्यांसह जुन्नर, आंबेगाव, मुळशी, मावळ, हवेली, दौंड, शिरूर, मालेगाव, निफाड, सिन्नर आणि राजापूर या तेराही तालुक्यांत ही कार्यपद्धती लागू केली जात आहे, अशी माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख संचालक एन. के. सुधांशु यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

जमिनीच्या मोजणीसाठी पूर्वीच्या पद्धतीनुसार नियमित, तातडी, अतितातडी आणि अति अतितातडी अशा चार पर्यायांद्वारे मोजणीची मागणी करता येत असे. नियमित मोजणीसाठी सहा महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत असे, तर नियमित मोजणी शुल्काच्या काही पट अधिक शुल्क भरून 15 दिवसांत मोजणीचे काम करून घेता येत असे.

ई-मोजणीच्या नव्या व्हर्जन 2 नुसार मोजणीसाठी आता नियमित व द्रुतगती, असे फक्त दोनच पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यापैकी एकाची निवड करून ऑनलाइन अर्ज भरताच मोजणीचे शुल्क समजणार असून, ते ऑनलाइन पद्धतीने देखील भरता येणार आहे.

शुल्क भरताच एसएमएसद्वारे मोजणीची तारीख अर्जदाराला कळविण्यात येणार असून, लगतच्या मालमत्ताधारकांनाही मोबाईलवर मोजणीची सूचना देणार्‍या नोटिसा तत्काळ पाठविल्या जाणार आहेत.

अक्षांश-रेखांशाचा होणार ‘क’ पत्रकामध्ये उल्लेख

मोजणीसाठी पूर्वी मोजमापे घेणार्‍या ठरावीक आकाराच्या मोजणी साखळीचा वापर केला जात असे. त्यानंतर प्लेन टेबल पद्धती आली. या पद्धतीत मीटरच्या टेपद्वारे मोजणी केली जात असे. तद्नंतर ईटीएस पद्धतीत यांत्रिक पद्धतीने मोजमापे घेतली जाऊ लागली. आता या सर्व पद्धती कालबाह्य ठरविल्या गेल्या असून, जीपीएस यंत्रणेशी संलग्न असलेल्या यांत्रिक बग्गीने (रोव्हर) मोजणी केली जाणार आहे.

त्यामुळे संबंधित जागेच्या अक्षांश व रेखांशाचीही नोंद होणार असून, एकदा या पद्धतीने नोंदणी झाली की ती कधीही बदलता येणार नाही. त्यामुळे शेजारच्याच्या हद्दीत शिरल्याचा वा ओव्हरलॅपिंगच्या समस्याही सुटू शकतील तसेच नाममात्र शुल्क भरून ही माहिती कोणालाही ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येईल.

जमीन मोजणीच्या या ऑनलाइन पद्धतीमुळे भू-करमापक वा भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांची मर्जी सांभाळण्याची गरज आता उरलेली नाही. तसेच, मनाला येईल इतकी रक्कम आकारून अशी कामे करून देणार्‍या एजंटांचेही त्यामुळे उच्चाटन होणार आहे. तथापि, या नव्या पद्धतीत वहिवाटीच्या अथवा 2, 3 गुंठे अशा छोट्या क्षेत्राच्या मोजण्या कशा करायच्या, हे अद्याप स्पष्ट केले गेले नाही. हा प्रश्न सोडविल्यास आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी रास्त दरातील किऑस्क सुरू केल्यास ही कार्यपद्धती अधिक उपयुक्त व लोकप्रिय होऊ शकेल.

- नितीन आगरवाल, मावळ तालुक्यातील मालमत्ताधारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news