

पुणे : झेंडूच्या फुलांनी सजलेले तोरण, सहकुटुंब केलेली पूजा-अर्जा, एकमेकांना भेटून आपट्याची पाने म्हणजेच सोनं देऊन दिलेल्या शुभेच्छा... असे उत्साही वातावरण विजयादशमी म्हणजेच दसर्याच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 2) घरोघरी पाहायला मिळणार असून, आनंदाने दसर्याचे पर्व साजरे केले जाणार आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्याच्या दिवशी नवीन कार्याची सुरुवात, नवीन वस्तूंची खरेदीचे निमित्त साधले जाणार असून, एकमेकांमधील कटुता विसरून एकत्र येण्याचा हा दिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार आहे. यासाठीची तयारीही पूर्ण झाली असून, मंदिरांमध्ये विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले आहेत. दसर्याच्या निमित्ताने काही मंडळांनी रावणदहनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
विजयादशमी म्हणजे दसरा संपूर्ण देशात हा सण मोठ्या थाटाने साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवण्याचा दिवस आहे. यादिवशी शुभ मुहूर्तावर नवीन कार्याला सुरुवात करतात. त्यामुळेच दसर्याच्या दिवशी नव्या वस्तूंची खरेदी, नवे करार, नव्या योजनांना सुरुवात होणार आहे. तर सोने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह गृह खरेदीचे निमित्त साधले जाणार आहे. तसेच, मंदिरांमध्ये विधिवत पूजनासह धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. घरांमध्ये देवी-देवतांचे विधीवत पूजन करण्यात येईल.
याशिवाय घराघरांमध्ये पंचपक्वानांचा बेतही आखला जाणार आहे. सायंकाळच्या वेळेस लहान मुले मोठ्यांना आपट्याची पाने (सोनं) देऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत. दसर्याला सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन केले जाणार आहे. काहींनी वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केले असून, त्या वस्तू शुभ मुहूर्तावर घरी आणल्या जाणार आहेत. एकूणच दसर्याच्या निमित्ताने सहकुटुंब एकत्र येऊन हा सण साजरा करणार असून, घरात धनसंपन्नता, यश, किर्ती, एकोपा, चैतन्य आणि आनंद नांदावा यासाठी प्रार्थना केली जाणार आहे.
दसरा हा गुरुवारी (दि. 2) असून, या दिवशी विजयी मुहूर्तावर लोक आपल्या नवीन उपक्रमांचा, नवीन कार्याचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 27 मिनिटे ते 3 वाजून 15 मिनिटे असा आहे, अशी माहिती दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी दिली आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने घराघरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि संस्थांमध्ये वस्तूंंची पूजा करण्यात येणार आहे. घराच्या दाराला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण उभारले जाणार आहे. तसेच, घरातील आणि कार्यालयातील मौल्यवान वस्तू आणि वाहनांचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. त्यांना झेंडूची फुले वाहण्यात येणार आहेत. या वेळी विद्येची देवता असलेल्या सरस्वतीदेवीचे पूजनही करण्यात येईल. लहान मुलांच्या अभ्यासाच्या वही-पुस्तकांचे पूजनही होईल.
दसर्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी (दि.1) बाजारपेठांमध्ये फुलांच्या खरेदीसह पूजा साहित्यांच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली. रविवार पेठ, मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह मार्केट यार्ड येथे खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली. प्रामुख्याने अनेकांनी झेंडूच्या फुलांच्या खरेदीला प्राधान्य दिले. तर अगरबत्तीपासून ते कापूरापर्यंत...अशा पूजा साहित्यांच्या खरेदीसाठी मंडईत लगबग दिसून आली. टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कॅम्प, खडकी आदी ठिकाणच्या दालनांमध्ये वाहनांच्या बुकिंगसाठी तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बुकिंगसाठीही तरुण-तरुणींनी दालनांमध्ये गर्दी केली. एकूणच सणाच्या निमित्ताने खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला.