

मंचर: बाजारामध्ये अंड्यांचे दर गडगडल्याने अंडी उत्पादक शेतकरी तसेच पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे. अंड्यांचा उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात विक्रीतून मिळणारे पैसे यामध्ये अंडी उत्पादक शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने अंडी उत्पादक शेतकर्यांना प्रतिअंड्यामागे अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाने अंडी उत्पादक शेतकर्यांना आर्थिक साहाय्य न केल्यास अंडी उत्पादन करणारे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत येऊन त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सद्य:स्थितीत दिसून येत आहे.
ग्रामीण भागात शेतीबरोबरच पोल्ट्री व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात असून, अनेक वाडी-वस्तीवर शेतकर्यांनी आपल्या शेतात मोठमोठे पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहेत. या पोल्ट्री व्यवसायात कोंबडी व अंडी व्यवसाय स्वतंत्र केला जात असून, सध्या दोन्ही व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
अंडी व्यावसायिक यांच्याकडून अंडी खरेदी करणार्या कंपनीने खरेदी दर कमी केला असून, 4 रुपये दराने अंडी खरेदी केली जात आहेत. एका अंड्यास उत्पादनासाठी जवळपास 4 रुपये 50 पैसे खर्च येतो. काही दिवसांपूर्वी थंडीच्या दिवसात 6 रुपये खरेदी दर होता, तो 2 रुपयांनी कमी झाल्याने कोंबड्यांचा खाद्याचा खर्च करणे देखील अवघड झाले आहे. पोल्ट्री व्यावसायिकाकडून चार रुपये प्रतिअंडे दराने अंडी खरेदी केले जात आहेत.
होलसेल विक्रेता ते दुकानदारांना हीच अंडी ती कंपनी साडेचार ते पाच रुपयांना विकत आहेत. दुकानदार ग्राहकाला सात ते साडेसात रुपयांना विकत आहेत. यात होलसेल दुकानदार व किरकोळ विक्रेते यांना नफा मिळत आहे. मात्र, अंडी उत्पादन करणारा व्यावसायिक अडचणीत आला आहे.
अंड्यांची पोल्ट्री तयार करण्यासाठी खूप खर्च येतो. 10 हजार कोंबड्यांची पोल्ट्री बनवण्यासाठी एक कोटी खर्च येतो. एवढा खर्च करूनही अंड्यांना बाजारभाव मिळत नसल्याचे दिसत आहे. शासनाने पशुखाद्य निर्मितीसाठी आणि लेयर कोंबडी खरेदीसाठी अनुदान दिले पाहिजे. तसेच, सद्य:स्थितीत अंडी उत्पादनासाठी होणारा तोटा भरून काढण्यासाठी प्रत्येक अंड्यामागे एक रुपया प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.
त्या माध्यमातून अंडी उत्पादन करणारे व्यावसायिक तग धरून राहतील; अन्यथा अंडी उत्पादन करणारे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील. याचा विचार करून शासनाने मदत करावी, अशी मागणी वैदवाडी येथील अंडी उत्पादक शेतकरी सागर प्रकाश तापकीर यांनी केली.
अंडी देणारी लेयर कोंबडी खरेदी करावी लागते. तिची किंमत 300 रुपये आहे. एका कोंबडीला दिवसाला 110 ते 120 ग्रॅम खाद्य लागते. ती दिवसाला एक अंडे देते. तिच्या एका अंड्याचा उत्पादन खर्च अंदाजे 4 रुपये 50 पैसे असून, चार रुपयांना अंडे खरेदी झाल्यास 50 पैशांचा तोटा एका अंड्यामागे सध्या आम्हाला सहन करावा लागत आहे. त्यात उष्णतेमुळे अंडी देणारे कोंबडी दगावली, तर मोठे नुकसान होते. देशात अंड्याचे मार्केट मोठे आहे. अंड्याच्या मार्केट कमिटीत शासनाचा प्रतिनिधी ठेवून अंड्याचे दर स्थिर कसे राहतील, यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- मारुती बढेकर, अंडी व्यावसायिक, वैदवाडी