

बारामती: तीन दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (दि. 23) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ऐन मे महिन्यातच गारठण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
यंदा बारामती तालुक्याने उन्हाचा कहर अनुभवला. अगदी मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका सोसावा लागला. मार्च, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. ही परिस्थिती दोन-तीन दिवसातच पावसाने बदलून टाकली. (Latest Pune News)
ढगाळ वातावरण आणि सतत सुरू असलेली पावसाची रिपरिप यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गारठण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जनजीवन विस्कळीत
सततच्या पावसाने जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. पाऊस उघडीपच देत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दरवर्षी जून, जुलैमध्ये बाहेर निघणारे रेनकोट, छत्र्या यंदा मे मध्येच वापरावे लागत आहेत.
आठवडे बाजारांवर परिणाम
अवकाळी पावसाचा परिणाम शहरासह गावोगावच्या आठवडे बाजारांवर होत आहे. पावसामुळे ग्राहक फिरकतच नसल्याने परिणामी बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतीमाल मिळेल त्या किमतीला विकावा लागत आहे.
वीजपुरवठा खंडित
बुधवारपासून शहर व तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारीही तो कायम राहिला. दुपारी चार वाजेपर्यंत शहर व तालुक्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या. शहरात वीजपुरवठा करणा-या वाहिन्या भूमिगत आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही अखंडित वीजपुरवठा यापूर्वी होत होता.
यंदा मात्र विविध कामांसाठी सुरू असलेल्या खोदाईमुळे पावसात विजेचा खेळखंडोबा होत असल्याचे पहायला मिळाले. शहराच्या अनेक भागात गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. एकीकडे सुरू असलेला पाऊस, त्यातच खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले होते.