

सुनील कडुसकर
पुणे : द्रुतगती महामार्गांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी मद्यधुंद वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी डोळ्यांच्या बुब्बुळांचा वेध घेणार्या प्रगत कॅमेर्यांचा वापर करण्यात येत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर बसविण्यात येत असलेले हे कॅमेरे वाहनचालकांच्या डोळ्यांच्या बुब्बुळांचा अचूक वेध घेऊन त्यातील बदलाच्या आधारे त्याने सेवन केलेल्या अल्कोहोलची माहिती देणार आहेत.
मिसिंग लिंक सुरू झाल्यावर तसेच रुंदीकरणानंतर दररोज 80 हजार प्रवासी वाहनांना सेवा (पीसीयू) देणार्या या महामार्गाची क्षमता 1 लाख 65 हजारांवर जाणार आहे. त्यामुळे येथील सुरक्षा उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मिसिंग लिंकवर आता असे प्रगत कॅमेरे बसविण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन वेगवान वाहनांची नोंद घेणारे (स्पीड गन) कॅमेरे यापूर्वीच संपूर्ण मार्गावर बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे मर्यादेपेक्षा अधिक वेगाने जाणार्या वाहनचालकांवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे. प्रवासासाठी लागणार्या वेळेआधारेही स्पीडिंगची कारवाई करण्याची योजना विभागाच्या विचाराधीन आहे. द्रुतगती मार्गावरून जाणार्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा ताशी 100 किलोमीटर आहे. त्यामुळे वाहनाने हा मार्ग ओलांडून जाण्याकरिता किती वेळ घेतला, याची नोंद घेऊन त्यावर कारवाई करण्याचा विचार आहे, असेही ते म्हणाले.
कसे काम करतात हे कॅमेरे?
* अल्कोहोल घेतलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांच्या बुब्बुळांचा आकार आणि रिफ्लेक्शन्स बदलतात.
* हे कॅमेरे वाहनचालकांच्या बुब्बुळांचा आकार, त्यांच्या हालचाली व प्रकाशाला देणारा प्रतिसाद टिपतात. त्याच्या विश्लेषणाआधारे ते आपला निष्कर्ष नोंदवितात.
* कॅमेर्याने पुरविलेल्या या माहितीच्या आधारे संबंधित चालक नशेत आहे का, हे ओळखणे सोपे जाते.
* या प्रगत यंत्रणेमुळे अपघातांना आळा घालणे आता अधिक सुलक्ष होणार.
* ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणीसाठी वाहनचालकाला थांबवावे लागते. आता त्याची गरज नाही.