

किशोर बरकाले
पुणे : राज्यात खरिपात सुरुवातीस झालेला चांगला पाऊस आणि नंतर पावसाने पाठ फिरविल्याने निर्माण झालेल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे यंदाची पिकांची उत्पादकता आणि उत्पादनात मोठी घट अपेक्षित मानली जात आहे. कृषी विभागाच्या पिकांच्या उत्पादकतेचा प्रथम पूर्वानुमान अहवाल हा नजर अंदाजित पिकांच्या उत्पादकतेवर आधारित असतो. त्या अहवालानुसार यंदाच्या खरीप २०२६ मध्ये अन्नधान्यांच्या उत्पादनात ३७ टक्के तर गळीत धान्यांच्या उत्पादनात ६४ टक्क्यांनी घट अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांच्या उत्पन्नास पावसाअभावी मोठा फटका बसला असल्याचे स्पष्ट होत आहे.
कृषी आयुक्तालयाकडून खरीप आणि रब्बी पिकांच्या उत्पादनाचे अंदाज वर्तविण्यात येतात. प्रथम पूर्वानुमान अहवालानंतर प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांद्वारे प्राप्त होणाऱ्या उत्पादकतेच्या आकडेवारीनंतर पिकांच्या उत्पादनाबाबतचे चित्र पुढे अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा असल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. राज्याचे सरासरी अन्नधान्ये उत्पादन (तृणधान्ये व कडधान्ये मिळून) हे ७७ लाख ६० हजार मेट्रिक टनाइतके आहे. ते यंदाच्या खरीप २०२६-२७ मध्ये दुष्काळी स्थितीमुळे घटून ४८ लाख ५७ हजार मे. टनाइतकेच हाती येण्याचा प्रथम नजरअंदाज आहे. म्हणजेच सुमारे २९ लाख ३ हजार मे. टनांनी (३७ टक्के) उत्पादनात घट येईल, अशी स्थिती आहे. शिवाय, राज्यातील गळीतधान्ये (तेलबिया) पिकांचे सरासरी उत्पादन हे ६३ लाख ६३ हजार मेट्रिक टनाइतके हाती येते. यंदाच्या २०२६-२७ च्या खरीप हंगामात २२.५९ लाख मे. टनाइतकेच उत्पादन हाती येण्याचा पहिला नजरअंदाज आहे. म्हणजेच सरासरीच्या ४०.७३ लाख मे.टनांनी गळीत धान्ये उत्पादनात घट अपेक्षित आहे.
राज्याचा खरीप पीक उत्पादनाचा पहिला नजरअंदाज विचारात घेता प्रतिहेक्टरी पिकांचे उत्पादनात (किलो) घटच झाल्याचे दिसून येते. सोयाबीनचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन १३०६.४४ किलो असून यंदा प्रत्यक्षात ४१८.८४ किलोंइतकेच (६८ टक्के घट) हाती आले आहे. तांदळाचे सरासरी उत्पादन २१०८.४१ किलो असून यंदा १६४१.४२ किलोइतके (२२ टक्के घट) मिळाले आहे. खरीप ज्वारीचे प्रतिहेक्टरी सरासरी ८१६.४० किलोचे उत्पादन घटून यंदा ४४५.१३ किलो (४५ टक्के घट), बाजरीचे सरासरी ९५१.१२ किलोइतके उत्पादन घटून ५६०.४१ किलोइतकेच (४१ टक्के घट) मिळाले आहे. या शिवाय सरासरी तुरीचे ९३८.०७ किलोचे उत्पादन घटून ४३९.०३ किलो (५३ टक्के), मूग ५०१.७७ किलोचे उत्पादन घटून ३२५.५२ किलो (३५ टक्के), उडदाचे ५४७.६८ किलोचे उत्पादन ३१४.०७ किलो (४३ टक्के), भुईमुगाचे सरासरी ११०६.९३ किलो उत्पादन घटून ९३१.५१ किलोइतकेच (१६ टक्के) मिळाले आहे.