

पुणे: पुणे महानगरपालिकेने नालेसफाई करण्यासाठी निविदा दिल्या असून, अनेक भागात नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या निविदा 50 टक्क्यांपेक्षा कमी दराने आल्याने नालेसफाई खरेच योग्य पद्धतीने व दर्जेदार पद्धतीने होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती.
त्यामुळे पालिकेने यावर उपाय म्हणून नाल्यातून काढण्यात येणारा गाळ कोठे टाकला जाणार, याची माहिती ठेकेदाराला द्यावी लागणार आहे. शिवाय उपसलेला गाळ वाहतूक करणार्या वाहनांवर जीपीएस बसवून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला पालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यांमधून काढण्यात येणारा गाळ नक्की काढला जातो का? तसेच काढला असेल तर तो कुठे टाकण्यात येतो याबाबत दरवर्षी पालिकेला जाब विचारला जातो.
त्यामुळे या वर्षी गाळ वाहतूक करणार्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग लावण्यात येणार आहे. तसेच काढलेला गाळ व टाकलेला गाळ याचा फोटोदेखील महापालिकेच्या अधिकार्यांना पाठवावा लागणार आहे. या गोष्टी गेल्यावरच ठेकेदारांना बिले अदा केली जाणार आहेत, असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहरात दरवर्षी पावसाळ्याआधी नाले सफाईच्या कामासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र निविदा काढल्या जातात. याद्वारे शहरातील पावसाळी वाहिन्या व रस्त्याच्या कडेला असलेली पावसाळी चेंबरची देखील स्वतंत्र निविदा काढून स्वच्छता केली जाते. मात्र, ही स्वच्छता करताना काढलेला गाळ हा नाल्याच्या किंवा चेंबरच्या बाजूलाच टाकला जातो.
मात्र, तो उचलला जात नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत हा गाळ पुन्हा नाल्यात जात असल्याने नालेसफाई ही फार्स ठरत होती. त्यामुळे महापालिकेकडून नाल्यांच्या स्वच्छतेनंतर काढलेला गाळ तसेच चेंबरच्या सफाईचा गाळ वाहतूक करण्यासाठी ठेकेदारांच्या वाहनांंना जीपीएस लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केली जातात. मात्र, पहिल्या पावसातच पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे खरेच नालेसफाई होते का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावर उपाय म्हणून नालेसफाईचे काम केल्यानंतर नाल्यातील गाळ ज्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्याचे फोटो दाखविल्यानंतरच पालिकेकडून ठेकेदाराला बिल अदा केले जाणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त पालिका आयुक्त