

Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी तंजावर, तामिळनाडू येथे ‘द्वितीय सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. शरद गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तंजावर संस्थानचे युवराज श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
तंजावरचे छत्रपती सरफोजीराजे भोसले हे बहुभाषिक आणि विद्वान राजे म्हणून ओळखले जातात. त्यांना तब्बल २८ भाषांचे ज्ञान होते. त्यांनी मराठी, संस्कृत, तमिळ, मोडी यांसह विविध भाषांमध्ये सुमारे ३५ महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले.
तंजावरमधील प्रसिद्ध ‘सरस्वती महाल’ ग्रंथालयाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. साहित्याबरोबरच कला, संगीत, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाचे काम केले.
सरफोजीराजेंचे हे योगदान आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे आणि त्यांच्या कार्याचा प्रचार व्हावा, या उद्देशाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तंजावरमध्ये होणारे हे संमेलन विशेष ठरणार आहे. दक्षिण भारतात आयोजित होणारे हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण मराठी साहित्य संमेलन असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने या संमेलनाला महत्त्व आहे. तंजावरचा मराठी इतिहास आणि महाराष्ट्राशी असलेले सांस्कृतिक संबंध यामुळे या सोहळ्याकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. शरद गोरे यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत १० ग्रंथांचे लेखन केले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्यानुवाद त्यांनी केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत १९७ साहित्य संमेलने झाल्याचे सांगण्यात आले आहे. या कामाची नोंद ‘अमेरिकन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. शरद गोरे यांनी साहित्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी अभिनय, गीतलेखन, संगीत, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
त्यांच्या ‘प्रेरणादायी प्रवास सूर्या’ या मराठी चित्रपटाला कान्स आणि बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
याशिवाय ‘युगंधर प्रकाशन’च्या माध्यमातून १५५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी २ हजारांहून अधिक व्याख्याने दिल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. शरद गोरे यांची सरफोजीराजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा हा सोहळा रंगणार असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.