डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कळसकर व अंदुरेच्या बहिणींची न्यायालयात साक्ष

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कळसकर व अंदुरेच्या बहिणींची न्यायालयात साक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेच्या दिवशी राखी पौर्णिमा होती. शरद कळसकर छ. संभाजीनगरला तर सचिन अंदुरे अकोल्यात रक्षाबंधनासाठी आले होते. त्यामुळे ते आमच्यासमवेत होते, अशी साक्ष कळसकर आणि अंदुरे यांच्या बहिणींनी शुक्रवारी (दि. 5) न्यायालयात दिली. दरम्यान, सीबीआय वकिलांनी साक्षीदारांची उलटतपासणी पुढील तारखेला घेण्यासंबंधी न्यायालयात विनंती केली. त्यानुसार या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी (दि. 16) होणार आहे.

डॉ. दाभोलकर खून प्रकरणात बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदारांची नावे असलेली यादी सादर करण्यात आली होती. न्यायालयाने साक्षीदारांना समन्स काढले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 5) अंदुरे आणि कळसकर यांच्या बहिणींची पी. पी. जाधव न्यायालयात साक्ष झाली. साक्षीदरम्यान कळसकर याच्या बहिणीने भाऊ शरद हा रक्षाबंधनासाठी छ. संभाजीनगरला आल्याचे सांगितले. तसेच, सचिन अंदुरेदेखील रक्षाबंधनासाठी अकोल्याला माझ्याकडे आला होता. त्याचा आंतरजातीय विवाह असल्याने त्याच्या लग्नात मध्यस्थी करावी, अशी सचिनची इच्छा होती. तेव्हा आई-वडिलांना आवडणार नाही.

तू असे करू नकोस, असे त्याला सांगितल्यावर तो राखी बांधून निघून गेल्याची साक्ष अंदुरे याच्या बहिणीने दिली. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. बचाव पक्षाच्या वतीने वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले. आता या दोन्ही साक्षीदारांची सीबीआय वकिलांतर्फे 16 जानेवारीला उलट तपासणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणात सीबीआयने आत्तापर्यंत 20 साक्षीदार सादर केले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news