जयदीप जाधव
उरुळी कांचन : प्रचंड वाहतूक कोंडीसह धोकादायक अवस्थेत असलेल्या पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते यवत या टप्प्यावरील महामार्गांची पुनर्उभारणी, तीनमजली उड्डाणपूल, मेट्रो मार्गिका अशा जागतिक कीर्तीच्या धर्तीवरील प्रस्तावित मार्गांसाठीचा महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात आला आहे. फेब—ुवारीअखेर हा ‘डीपीआर’ राज्य मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याचे समजते.
हडपसर ते यवत महामार्ग कोंडीमुक्त व सुरक्षित होण्यासाठी पहिले पाऊल यामुळे पडणार आहे. हडपसर ते यवत या 31.5 किलोमीटरच्या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ‘डीपीआर’ला अंतिम स्वरूप देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
2004 साली ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या धर्तीवर कवडीपाट ते कासुर्डी, तर कासुर्डी ते सोलापूरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करून विस्तारित करण्यात आला आहे.
कवडीपाट ते कासुर्डी या महामार्गाची टोलवसुली मुदत 2019 मध्ये संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या महामार्गाची अवस्था अतिशय धोकादायक झाली आहे. तसेच, या महामार्गाभोवतीचे वाढते शहरीकरण, लोकसंख्येमुळे हडपसर ते यवतपर्यंत महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. हडपसर ते कवडीपाटपर्यंत शहरीकरणाचा बोजा तसेच कवडीपाट ते यवतपर्यंत वाहतुकीसाठी रस्ता अतिशय धोकादायक व वाहतूक कोंडीग्रस्त झाल्याने या महामार्गासाठी आ. राहुल कुल यांनी सातत्याने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना भेटून या महामार्गाची पुर्नउभारणी व कोंडीमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने मिळून हडपसर ते यवतपर्यंत हा महामार्ग विकसित करण्याच्या धोरणानुसार या महामार्गाच्या पुर्नउभारणी करण्यास सुरुवात झाली आहे. महामार्गावर काही ठिकाणी मार्गाची रचना एक्सिट व एन्ट्री अशी करून डीपीआर तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या महामार्गाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल.