विधानसभा निवडणुकीत अपयश कशामुळे आले? आपण कमी कुठे पडलो? यासंदर्भात कार्यकर्त्यांची आत्मचिंतन बैठक माजी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. विधानसभेतील पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन बेनके यांनी कार्यकर्त्यांना या वेळी केले.
जुन्नर तालुक्यात गेल्या पाच वर्षांत 3330 कोटी रुपयांचा निधी आणला. गावोगावी पक्षाची ताकद मजबूत असतानाही आपला पराभव नेमका कशामुळे झाला, याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. आगामी काळात पक्षसंघटना मजबूत करून गावपातळीवर पक्षकार्यकर्त्यांची फौज उभी करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने काम करू, असे बेनके यांनी सांगितले.
बेनके म्हणाले, मंजूर करून आणलेली सगळी कामे मार्गी लावणार आहे. जुन्नर शहरामध्ये पक्षाचे स्वतंत्र कार्यालय लवकरच सुरू केले जाईल. आगामी काळात सगळ्यांना विश्वासात घेऊन पक्षसंघटनेत फेरबदल करू. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक लढणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे आदींनी या वेळी मार्गदर्शन केले. या बैठकीला कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, राष्ट्रवादीचे जुन्नर शहराध्यक्ष पापा खोत, माजी सभापती विशाल तांबे, विनायक तांबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल भांबेरे, गोविंद साबळे, मारुती वायाळ, संतोष तांबे, उज्ज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, सुप्रिया लेंडे, गोविंद बोरचटे, प्रकाश ताजने, काळू शेळकंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.